१२ हजारांहून अधिक कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:30+5:302021-04-17T04:19:30+5:30
श्रीरामपूर : कोरोनाच्या संकट काळात सरकारी रुग्णालये मानवतेच्या हिताचे कसे आदर्शवत काम उभे करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणून ...
श्रीरामपूर : कोरोनाच्या संकट काळात सरकारी रुग्णालये मानवतेच्या हिताचे कसे आदर्शवत काम उभे करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणून येथील ग्रामीण रुग्णालय समोर आले आहे. अवघ्या दहा रुपयांत कोरोनाची चाचणी, ज्येष्ठ व दारिद्र्यरेषेखालील गरजूंना मोफत सेवा यांमुळे सर्वसामान्य रुग्णांची लाखो रुपयांची लूट थांबली आहे.
पहिल्या लाटेपासून आजपावेता येथे १२ हजारांहून अधिक चाचण्या झाल्या असून, रुग्णालयाने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. खासगी प्रयोगशाळा व रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणीकरिता २५० ते ९५० रुपयांपर्यंत पैसे आकारले जातात. त्यातही चाचणीसाठी कीटचा तुटवडा झाल्यास या दरांत वाढ होते. मात्र अशी कोणतीही लूट सरकारी मालकीच्या ग्रामीण रुग्णालयात होत नाही. त्यामुळे कोरोना संकट व लॉकडाऊनमध्ये जनतेला रुग्णालयाचा आधार मिळाला आहे.
पहिल्या लाटेमध्ये येथे दहा हजारांहून अधिक तर दुसऱ्या लाटेत १४ फेब्रुवारीपासून दोन हजार ४१५ चाचण्या झाल्या आहेत. दररोज शंभर ते दीडशे चाचण्या सध्या सुरू आहेत. ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ, स्वातंत्र्यसैनिक, अपंग व गरिबांसाठी चाचणी पूर्णपणे मोफत आहे हे विशेष. रिक्षा, टेम्पो अथवा इतर वाहनांमध्ये आलेल्या आजारी रुग्णांची वाहनामध्येच चाचणी घेतली जाते. त्यासाठी अडवणूक केली जात नाही. खासगी प्रयोगशाळेच्या तुलनेत येथे आपुलकीची सेवा मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकही इकडे वळाले आहेत.
---------
सरकारने कर्मचाऱ्यांना कायम करावे
गेल्या एक वर्षापासून येथील कंत्राटी तत्त्वावरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ लक्ष्मीकांत कर्पे, पुरुषोत्तम शिंदे, शबाना खान, प्रसन्न धुमाळ, तसेच इतर सहकारी वैद्यकीय अधीक्षक योगेश बंड यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांच्या चाचण्या घेत आहेत. योग्य ती खबरदारी घेतल्याने आजवर एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली नाही.
----------
उद्यानात होते चाचणी
ग्रामीण रुग्णालयाचा परिसर हा राज्यात सर्वाधिक स्वच्छ व संसर्गमुक्त म्हणून सलग तीन वर्षे पुरस्कार प्राप्त ठरला आहे. त्यामुळे रुग्णालयासमोरील उद्यानामध्ये संशयितांच्या चाचण्या पार पडतात. मोकळ्या हवेमुळे कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव होतो. संशयितदेखील सुखद वातावरणामुळे तणावमुक्त होतात.
------------
मदर तेरेसा यांना आदर्श मानून आम्ही काम करत आहोत. देशावर आलेली ही मोठी आपत्ती असून सैनिकांप्रमाणे जबाबदारी निभावयाची आहे.
- लक्ष्मीकांत कर्पे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रामीण रुग्णालय
--------