श्रीरामपूर तालुक्यात ८० टक्क्याहून अधिक मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:12+5:302021-01-16T04:24:12+5:30
बेलापूर येथे मतदान केंद्रावर मोबाईल नेऊन गर्दी करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत रस्त्यावर ठाण ...
बेलापूर येथे मतदान केंद्रावर मोबाईल नेऊन गर्दी करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन केले. या व्यतिरिक्त इतरत्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. बेलापूर, टाकळीभान, पढेगाव, वडाळा महादेव या मोठ्या ग्रामपंचायतींसाठी सायंकाळी पाच वाजेनंतरही मतदान सुरू होते. त्यामुळे प्रशासनाने मतदान केंद्रावरील प्रवेशद्वार बंद करून आतील लोकांचे मतदान करून घेतले. मात्र केंद्रावर विनाकारण गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना चाप लावला. त्यामुळे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
तालुक्यातील २६६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्याकरिता ५७७ उमेदवार रिंगणात आहेत. सायंकाळी सर्व मतदान यंत्र मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली. तेथे पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.महिला उमेदवारांनीही मतदान केंद्रावर उपस्थिती लावली होती. महिला मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह पहायला मिळाला. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याकरिता वाहने लावण्यात आली होती. ही वाहने थेट केंद्रामध्ये प्रवेश करत होती. बंदोबस्तावरील पोलिसांना मात्र त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
..............
बेलापुरात गोंधळ
बेलापूर येथे कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मोबाईल नेत गर्दी केली. त्यामुळे पोलीस निरीक्षक आयुष नोपाणी यांनी पथकासह याविरोधात कडक भूमिका घेतली. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गाडीत बसविले. त्यामुळे भाजप नेते सुनील मुथ्था यांनी रस्त्यावरच ठाण मांडून आंदोलन सुरू केले. पोलिसांनी समज देऊन हा प्रकार शांततेत मिटविण्याऐवजी विनाकारण कारवाई केल्याचा आरोप मुथ्था यांनी केला. मात्र निरीक्षक नोपाणी यांनी पोलिसांनी बळाचा वापर न करता अनुचित प्रकार घडू नये म्हणून कारवाई केल्याचे सांगितले.
--------
प्रस्थापितांसमोर आव्हान
टाकळीभान येथे माजी सभापती नानासाहेब पवार, कारेगाव येथे माजी सभापती दीपक पटारे, बेलापूर येथे बाजार समितीचे संचालक सुधीर नवले या तालुक्यातील मातब्बर नेत्यांसमोर यावेळी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मातब्बरांच्या ग्रामपंचायतींवर प्रदीर्घ सत्तेला आव्हान देताना विरोधकांनी एकत्रित येत मोट बांधल्याचे यावेळी दिसले.
(१५श्रीरामपूर)