चारशेहून अधिक कविता, व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजप्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:37+5:302021-01-18T04:18:37+5:30
नेवासा : कोरोनाच्या जनजागृतीला चित्रकलेची जोड देत चारशेहून अधिक कविता, व्यंगचित्र व वात्रटिकेच्या माध्यमातून चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी समाज ...
नेवासा : कोरोनाच्या जनजागृतीला चित्रकलेची जोड देत चारशेहून अधिक कविता, व्यंगचित्र व वात्रटिकेच्या माध्यमातून चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी समाज प्रबोधन केले आहे. हे कार्य ते गेल्या १० महिन्यांपासून अविरत करत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना सामाजिक संदेश देण्याच्या दृष्टीने हे काम उदावंत १४ मार्च २०२० पासून करीत आहेत. बाजारात कोरोनाची लस उपलब्ध झाली तरीही सामाजिक संदेशांचे भान ठेवत समाज हितासाठी कुणाकडून आर्थिक मदत न घेता ते सातत्याने निरंतर काम करीत आहेत.
त्यांनी कविता, वात्रटिका, चारोळी, व्यंगचित्राच्या माध्यमातून काेरोनाबाबतच्या जनजागृतीचा प्रवास सुरू केला. त्यांनी गेल्या दहा महिन्यात चारशे कविता, वात्रटिका, विनोदी व्यंगचित्र रेखाटून या माध्यमातून जनजागृतीचे काम केले. त्याचबरोबर नेवासा शहर, तालुक्यातील गावातील नागरिकांना कोरोनाबाबतची माहिती मिळावी, यासाठी त्यांनी मिळेल त्या जागेवर स्व. खर्चाने मास्क वापरा, वारंवार हात धुवा, गर्दी टाळा तसेच सुरक्षित अंतर ठेवा, असे संदेश रेखाटले. अगदी झाडे, दगड, पाषाणही त्यांनी बोलके केले. इमारतीच्या छोट्या-मोठ्या भिंतीवरही संदेश लिहून जनजागृतीचा एक आगळावेगळा उपक्रम राबविला.
या सामाजिक उपक्रमासाठी त्यांचे शिष्य व्यंगचित्रकार रवी भागवत व मुलगा चित्रकार सत्यजित उदावंत यांनीही त्यांना मदत केली. चित्रकार सत्यजित यांनी राज्यभर प्रबोधन होण्यादृष्टीने सोशल मीडिया माध्यमाचा अवलंब केला. त्यामुळे कोरोना जनजागृतीचे कार्य अधिक गतिमान झाले. इतर राज्यातही कोरोनाचे प्रबोधन व्हावे यासाठी इंग्रजी व हिंदी भाषेच्या माध्यमातून वात्रटिका, कविता, चारोळ्या संदेश तयार करून देशपातळीवर कार्य पोहचवले.
वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखायला हवा. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आता तरी मानवाने सुधरायला हवे, असे मत भरतुकमार उदावंत यांनी व्यक्त केले.
-----
मतदार जनजागृतीतही योगदान..
यापूर्वी चित्रकार उदावंत यांनी राष्ट्रीय कार्यास हातभार म्हणून मतदार जनजागृती अभियान राबविले आहे. तसेच ते शासन सन्मानित लोककलावंत आहेत. ते चित्रकलेच्या माध्यमातून २५ वर्षांपासून समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत.
फोटो दोन आहेत
१७ नेवासा कोरोना, १
चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी कोरोना जनजागृतीसाठी रेखाटलेले चित्र.