जिल्ह्यातील चार लाखाहून अधिक बालकांना मिळणार पोलिओ लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:21+5:302021-01-08T05:03:21+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना १७ जानेवारीच्या रविवारी पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. एकही बालक ...
अहमदनगर : जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना १७ जानेवारीच्या रविवारी पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मोबाइल टीमच्या माध्यमातून लसीकरणाचे नियोजन करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उप-जिल्हाधिकारी संदीप निचीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ३८ हजार ८६६ बालकांना पोलिओची मात्रा दिली जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ३ लाख ७५ हजार ९३७, महानगरपालिका क्षेत्रातील ४६ हजार २२० आणि नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील १६ हजार ६६९ बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे.
जिल्ह्यात शंभर टक्के बालकांना पोलिओचा डोस मिळावा, यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी प्रयत्न करावे. नागरिकांनीही त्यांच्या बालकांना पोलिओचा डोस लसीकरण केंद्रावर येऊन द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले. या मोहिमेत १७ जानेवारीला ज्या बालकांना लस मिळाली नसेल त्यांच्यासाठी ग्रामीण भागात १९ जानेवारी ते २१ जानेवारी आणि नागरी भागात १९ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी शोध घेणार आहेत.
-------
आठ हजार कर्मचारी
लसीकरणाच्या या मोहिमेसाठी ८ हजार ७९ आरोग्य कर्मचारी इतके मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. अंमलबजावणीसाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी बैठकीत दिली.