नगरमध्ये दररोज दोन हजारांहून अधिक चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:23 AM2021-05-27T04:23:25+5:302021-05-27T04:23:25+5:30
अहमदनगर : नगर शहरातील रुग्णसंख्या घटली असून, महापालिकेकडून दररोज दोन हजारांहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. गुरुवारी सर्वाधिक तीन ...
अहमदनगर : नगर शहरातील रुग्णसंख्या घटली असून, महापालिकेकडून दररोज दोन हजारांहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. गुरुवारी सर्वाधिक तीन हजार चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह येण्याचे हे दैनंदिन प्रमाण केवळ २.७६ टक्के इतकेच असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. हेच प्रमाण दोन दिवसांपूर्वी १० टक्के होते.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरात कठोर निर्बंध लागू करत विनाकारण फिरणाऱ्यांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढली असून, रस्त्यावरील गर्दी ओसरली आहे. शहरातील रुग्णांची संख्याही कमी आहे. मागील एप्रिल महिन्यात संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह येत होते. हे प्रमाण अलीकडे कमी झाले असून, रुग्णसंख्याही घटली आहे. त्यामुळे नगरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शहरातील रुग्णसंख्या सध्या शंभरच्या आत आहे. रुग्ण संख्या कमी झाली असली तरी महापालिकेने चाचण्यांचा वेग वाढविला आहे. आरोग्य कर्मचारी रस्त्यावर येऊन चाचणी करत आहेत. याशिवाय कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्याही चाचण्या करण्यात येत असल्याचे चाचण्यांची संख्या वाढली आहे.
...
मनपाने केलेल्या चाचण्या
दि.१८-११९३
दि. १९-८३७
दि.२०- १४१०
दि.२१-१४९८
दि.२२- १७९३
दि.२३-२००५
दि. २४-२८४३
दि.२५-२४६३
दि.२६-२९००