नगरमध्येच सर्वाधिक जातीय अत्याचाराच्या घटना: माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे

By शिवाजी पवार | Published: August 29, 2023 06:36 PM2023-08-29T18:36:43+5:302023-08-29T18:37:08+5:30

जाणीवपूर्वक प्रयत्नाची शक्यता वर्तवली

Most incidents of communal violence in the city itself; | नगरमध्येच सर्वाधिक जातीय अत्याचाराच्या घटना: माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे

नगरमध्येच सर्वाधिक जातीय अत्याचाराच्या घटना: माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे

श्रीरामपूर (जि. अहमदनगर)  : जातीय अत्याचाराच्या सर्वाधिक घटना नगर जिल्ह्यात घडत आहेत. आरक्षित मतदारसंघांमध्ये अशा घटना जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत का? हे तपासावे लागेल, असा प्रश्न माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी उपस्थित केला. 

 हरेगाव येथे चार तरुणांचा अमानुषरित्या छळ करण्यात आला. पीडित तरुण येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी हंडोरे येथे आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी सभापती सचिन गुजर, अशोक कानडे, बाबासाहेब दिघे, युवक काँग्रेसचे हेमंत ओगले, भीमशक्तीचे संदिप मगर यावेळी उपस्थित होते.
     हंडोरे म्हणाले, नगर जिल्ह्यात जातीयवादी घटनांमागे षडयंत्र आहे का? याचा विचार व्हायला हवा. राजकीयदृष्ट्या ते काहींसाठी सोयीस्कर ठरत असावे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकारदेखील यामागे असू शकतो? याबाबत ठोस उत्तर नसले तरी याचा शोध घेणे गरजेचे आहे.

 पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडता कामा नये. सर्व आंबेडकरी संघटना, व्यापारी तसेच सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येत समिती गठित करावी. दोन समाजामध्ये सलोखा वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. जातीयवादी घटना घडणार नाहीत यासाठी एकजुटीने प्रयत्न गरजेचे आहेत, असे हंडोरे म्हणाले.
   हरेगाव येथील घटनेतील पीडित हे अल्पवयीन आहेत. त्यामुळे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर आरोपींवर मोक्काची कारवाई करावी.

आरोपी नानासाहेब गलांडे याचा सावकारीचा व्यवसाय आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. काही घटना दहशतीमुळे दबलेल्या आहेत. त्यात कारवाई झालेली नाही. पीडितांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांना थुंकी चाटण्यास सांगितले गेले. पायाला जबर जखमा केल्या गेल्या. लघुशंका करण्यात आली. या प्रकारा निषेध करावा तेवढा कमी आहे, असे हंडोरे यांनी सांगितले.

Web Title: Most incidents of communal violence in the city itself;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.