जमीन नावावर करुन देत नसल्याने आई, वडिल, बहिणीस मारहाण; मुलासह जावयास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:16 PM2020-02-26T18:16:04+5:302020-02-26T18:17:32+5:30
संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथे जमीन नावावर करुन देत नसल्याने मुलाने व जावायाने वृध्द आई, वडिलांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (२४ फेब्रुवारी) रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत. आश्वी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एक जण फरार झाला आहे.
आश्वी : संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथे जमीन नावावर करुन देत नसल्याने मुलाने व जावायाने वृध्द आई, वडिलांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (२४ फेब्रुवारी) रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत. आश्वी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एक जण फरार झाला आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात महादू मारुती वर्पे यांनी मंगळवारी (दि.२५) फिर्याद दाखल केली आहे. २४ फेब्रुवारी रोजी मी घरात झोपलो होतो. यावेळी सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुलगा नवनाथ वर्पे याने दोन एकर जमिन नावावर करुन दे..असे म्हणत मला लाकडी दांडक्याने व कु-हाडीने मारहाण केली. यावेळी आरोपीमधील एकाने वीट फेकून मारली. आरोपी जावई नवनाथ पाटोळे याने पत्नीला मारहाण केली. नवनाथ वर्पे याने मुलीच्या डोक्यावर कु-हाडीचे चार वार केले. आम्हाला यावेळी आरोपींनी शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देखील दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरुन आश्वी पोलीस ठाण्यात नवनाथ महादू वर्पे, आबाजी महादू वर्पे, नवनाथ लक्ष्मण पाटोळे, अंकुश नवनाथ पाटोळे (सर्व रा. वरवंडी ता.संगमनेर) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ व आबाजी हे मुले असून नवनाथ पाटोळे हा जावई आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी भेट दिली. नवनाथ वरपे, नवनाथ पाटोळे, अंकुश पाटोळे यांना ताब्यात घेतले आहेत. आबाजी वरपे फरार झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत.