माहेरी अंगणात झाड लावून लेक निघाली सासरी; गोळेगावात एक झाड लेकीचे, एक झाड सुनेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 08:09 AM2024-03-02T08:09:47+5:302024-03-02T08:09:56+5:30
गोळेगाव (ता. शेवगाव) येथील झाड फाउंडेशनकडून नवदाम्पत्याच्या उपस्थितीत ‘लेकीचे झाड’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
- संजय सुपेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
बोधेगाव (जि. अहमदनगर) : पोरी लग्न होऊन सासरी जातेय माहेरी एक झाड लाव...! सुनबाई लग्न होऊन सासरी आलीस.. तुझ्या हस्ते एक झाड लाव. होय ! आहे ना अभिनव उपक्रम.
गोळेगाव (ता. शेवगाव) येथील झाड फाउंडेशनकडून नवदाम्पत्याच्या उपस्थितीत ‘लेकीचे झाड’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
पर्यावरणपूरक अभिनव उपक्रम
nगोळेगावात सुनेनंतर आता लेकीचे झाड हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गुरुवारी गावातील राजू फुंदे यांची कन्या डॉ. विद्या व नागलवाडी येथील राम गिते यांचे सुपुत्र अभिजित यांचा विवाह झाला.
nनववधूची सासरी पाठवणी करण्यापूर्वी नवदाम्पत्याच्या हस्ते माहेरच्या अंगणात आंब्याचे रोप लावून गोळेगावच्या ‘लेकीचे झाड’ असे नामकरण करून या उपक्रमास प्रारंभ झाला.
nयावेळी झाड फाउंडेशनचे अध्यक्ष संजय आंधळे, सचिव बाबा डोंगरे, सदस्य शरद फुंदे, सुरेश फुंदे व अनेकांची उपस्थिती होती. याशिवाय गावातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्मृती वृक्ष’ लावण्याच्या उपक्रमासही फाउंडेशनने प्रारंभ केला.
प्रत्येकाच्या जन्मदिवशी वृक्षारोपण..
येणाऱ्या काळात महापुरुषांची जयंती व पुण्यतिथीनिमित्त तसेच गावातील प्रत्येकाच्या जन्मदिवशी गोळेगाव येथे एक झाड लावण्यात येणार असल्याने फाउंडेशनचे सांगितले.