महावितरणविरूद्ध भडका

By Admin | Published: May 21, 2014 11:55 PM2014-05-21T23:55:19+5:302014-05-22T00:03:37+5:30

अहमदनगर : शहरासह उपनगरातील अनेक भागात सुरू असलेले भारनियमन, तसेच मंगळवारी मध्यरात्री दोन तास वीज खंडित झाल्याने महावितरणविरूद्ध संतप्त नागरिकांच्या उद्रेकाचा भडका उडाला.

Motion against the MSEDCL | महावितरणविरूद्ध भडका

महावितरणविरूद्ध भडका

अहमदनगर : शहरासह उपनगरातील अनेक भागात सुरू असलेले भारनियमन, तसेच मंगळवारी मध्यरात्री दोन तास वीज खंडित झाल्याने महावितरणविरूद्ध संतप्त नागरिकांच्या उद्रेकाचा भडका उडाला. केडगावला मध्यरात्री नागरिकांनी रास्ता रोको केला, तर आ. राठोड यांनी महावितरणचे अधिकारी कोंडून ठेवण्याचा इशारा दिला. शहरातील हातमपुरा, डावरे गल्ली, भिंगार, दरेवाडी आदी भागांत सध्या सहा तासांपेक्षा जास्त भारनियमन सुरू आहे. ते बंद करण्याची मागणी ग्राहकांनी अनेकदा केली. परंतु अधिकारी दाद देत नाहीत, त्यामुळे आ. राठोड यांनी कार्यकर्त्यांसह महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांची मंगळवारी भेट घेतली. थकबाकी व वसुलीच्या सूत्रानुसार जरी हे भारनियमन होत असले तरी त्यात नियमितपणे बिले भरणारे ग्राहक नाहक भरडले जातात. थकबाकी असेल तर ती वसूल करण्याचे व वीजचोरी होत असेल तर ती पकडण्याचे काम महावितरणचे आहे. त्यावर सरसकट भारनियमन हा उपाय होऊ शकत नाही. यात प्रामाणिक ग्राहकांनी का भरडायचे, असा सवाल करत आ. राठोड यांनी भारनियमन त्वरित बंद करा, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. दुसरीकडे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे केडगाव येथील संतप्त नागरिकांनी नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर-पुणे रस्त्यावर ठिय्या दिला. वाहतूक ठप्प झाल्याने काही वेळातच पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. नंतर महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता हे तातडीचे भारनियमन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तर लोकांचा पारा आणखी चढला. दरम्यान, बुधवारी पुन्हा आ. अनिल राठोड यांच्यासह हातमपुरा भागातील लोकांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. १०० टक्के वसुली असूनही या भागात कोणत्या नियमानुसार भारनियमन होते. हे फीडर त्वरित माळीवाडा केंद्रावर जोडा, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर अधिकार्‍यांनी दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी) दरेवाडी, भिंगारकरांचाही संताप दरेवाडी, भिंगारमध्ये सव्वासहा तास भारनियमन सुरू आहे. ४२ टक्क््यांपेक्षा जास्त गळती असल्याने ते होत असल्याचे अधिकारी सांगतात. परंतु वीजचोरीला आळा घालण्यासाठी काहीही उपाय होत नाहीत. जो नियमित बिल भरतो त्याला वीज मिळालीच पाहिजे, एकामुळे अनेकांना त्रास खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे त्वरित भारनियमन रद्द करावे, अन्यथा कार्यालयावर मोर्चा आणू, असा इशारा भिंगारचे वसंत राठोड यांनी दिला.

Web Title: Motion against the MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.