नगर तालुक्यात अण्णांच्या समर्थनार्थ मोटारसायकल रॅली काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 09:56 PM2018-03-21T21:56:35+5:302018-03-21T21:56:56+5:30
या आंदोलनाच्या समर्थनार्थ नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, हिवरे झरे परिसरातील युवक व शेतकरी खडकी ते राळेगण सिद्धीपर्यंत शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढणार आहेत.
केडगाव : शेतकऱ्यांचे प्रश्न, जनलोकपाल व लोकायुक्त नियुक्ती यांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून (दि. २३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, हिवरे झरे परिसरातील युवक व शेतकरी खडकी ते राळेगण सिद्धीपर्यंत शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढणार आहेत.
अण्णा हजारे यांनी शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतक-यांना पेन्शन योजना लागू करावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, लोकपाल व लोकायुक्त यांची तत्काळ अंमलबजावणी यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. अण्णांच्या आंदोलनासाठी नगर तालुक्यातून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, खंडाळा येथील युवक व शेतकरी खडकी ते राळेगणसिद्धीपर्यंत मोटारसायकल रॅली काढणार आहेत. रॅली शुक्रवारी सकाळी ९ वाजता खडकीतून निघणार आहे. सारोळा कासार, अस्तगाव, वाळवणे, सुपामार्गे राळेगणसिद्धीला जाणार आहे.
दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाविषयी गावोगावी फिरून जनजागृती करणार आहे. आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवक व शेतक-यांकडून करण्यात येत आहे. रॅलीमध्ये २०० पेक्षा अधिक मोटारसायकली घेऊन विद्यार्थी, तरुण व शेतकरी सहभागी होणार आहेत.
शनिवारी घंटानाद आंदोलन
विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत आहेत. अण्णांच्या मागण्या तातडीने मान्य करव्यात. यासाठी सरकारला जागे करण्यासाठी खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा येथील युवक व शेतकरी खडकी येथे घंटानाद आंदोलन करणार आहेत.