राजूर गावात अडचणींचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:16+5:302021-09-23T04:23:16+5:30
राजूर शहरातील सुमारे एक हजार सातशे पन्नास नळपाणी धारकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी निळवंडे जलाशयाच्या कडेला असलेल्या जॅकवेलमध्ये ८५ अश्वशक्तीचे ...
राजूर शहरातील सुमारे एक हजार सातशे पन्नास नळपाणी धारकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी निळवंडे जलाशयाच्या कडेला असलेल्या जॅकवेलमध्ये ८५ अश्वशक्तीचे दोन वीज पंप बसविण्यात आलेले आहेत. मागील काही काळापासून या वीज पंपांचे वीज बिल थकीत गेल्याने ही थकबाकी व्याजासह तीन कोटी साठ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
नळपाणी पुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी दरमहा येणारे सुमारे सहा लाख रुपयांपर्यंतचे वीज बिल भरणे ग्रामपंचायतीला क्रमप्राप्त आहे. एवढे येणारे बिल भरणे ही समस्या प्रशासकीय राज्यात ग्रामपंचायतीला सध्या डोकेदुखी ठरत आहे. त्यातच अनेक ग्राहकांकडे असलेली मोठ्या प्रमाणावरील थकलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा मोठा प्रश्न आहे. ग्रामपंचायतचे वसुली कर्मचारी दररोज थकबाकीदारांच्या घरी चकरा मारत असतात, मात्र ही वसुली होत नसल्याचे ग्रामपंचायतकडून समजले.
दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी ग्रामस्थ आपला कर नियमितपणे भरत आहेत. काही ग्रामस्थ सोयीस्कररीत्या हा कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र ध्वनिक्षेपकावरून दिलेल्या दवंडीवरून स्पष्ट होत आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीज प्रवाह खंडित होणे म्हणजे नियमितपणे कर भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होणार का? याबरोबरच मोठी थकबाकी असणाऱ्या ग्राहकांवर ग्रामपंचायत कारवाई का करत नाहीत, असा सवाल नियमितपणे कर भरणाऱ्या ग्राहकांमधून व्यक्त होत आहे. किमान पाणीपुरवठा सुरळीत ठेवायचा असेल तर थकबाकीदारांनी आपली पाणीपट्टी आणि घरपट्टी त्वरित भरावी, असे आवाहन ग्रामपंचायतमार्फत राजूर शहरातून ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत आहे.
....................
ग्रामपंचायतचे आर्थिक बजेट कोलमडले
दरमहा येणारे पाणीपुरवठा वीज बिल भरले गेले नाहीतर नळ पाणीपुरवठा खंडित होत असतो. हे बिल भरण्यासाठी थकबाकीदारांनी आपली ग्रामपंचायतची थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन ग्रामपंचायतमार्फत केले जात आहे. वसूल होत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले आहे. एकंदरीत ग्रामपंचायतचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.