कोळगाव, चिखली शिवारातील डोंगरास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:37 AM2021-03-04T04:37:14+5:302021-03-04T04:37:14+5:30
श्रीगोंदा : कोळगाव, चिखली शिवारातील मैंदोबा डोंगर माथ्यावरील जंगलाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत अनेक पशू, पक्षी, ...
श्रीगोंदा : कोळगाव, चिखली शिवारातील मैंदोबा डोंगर माथ्यावरील जंगलाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत अनेक पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. आगीत १ हजार एकर क्षेत्रातील वन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड यांनी वन विभागाला आगीची माहिती दिली. वनरक्षक हरीश मुंढे, अनंत तिवारी त्यांचे सहकारी घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले. त्यांना चिखली, कोळगाव परिसरातील नागरिकांनी मदत केली. उन्हाळा सुरू झाला आहे. जंगलाला आग लागण्याच्या घटना दरवर्षी घडतात. यात कोट्यवधी रुपयांची नैसर्गिक संपत्ती नष्ट होते; पण याकडे तांत्रिकदृष्ट्या वन विभाग गांभीर्याने पाहत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
....
जंगलाला आग लागली तरी ठरावीक अंतरात विझावी म्हणून जाळ रेषा ठिकठिकाणी असतात. पण जाळ रेषा नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आगीत संपूर्ण जंगलच जळून नष्ट होते. याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
- अमोल लगड,
सामाजिक कार्यकर्ते, कोळगाव.