मुळा धरणावरील पुलासाठी रणरणत्या उन्हात आंदोलन
By Admin | Published: April 19, 2017 07:43 PM2017-04-19T19:43:25+5:302017-04-19T19:43:25+5:30
रणरणत्या उन्हात गावकऱ्यांनी राहुरी तहसीलवर मोर्चा काढला़ पुलाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चाच्यावतीने देण्यात आला़
आॅनलाइन लोकमत
राहुरी (अहमदनगर) दि़ १९- मुळा धरण झाल्यानंतर ४७ वर्षानंतरही वावरथ,जांभळी,जांभुळबन या गावाकडे जाणाऱ्या पुलाचा प्रश्न मार्गी न लागल्याने त्यासाठी मंगळवारी रणरणत्या उन्हात गावकऱ्यांनी राहुरी तहसीलवर मोर्चा काढला़ पुलाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चाच्यावतीने देण्यात आला़
मिशन प्रांगणातून घोषणा देत मोर्चा राहुरी तहसील कचेरीवर धडकला़ मोर्चाच्यावतीने नायब तहसीलदार सुभाष कदम यांना पुलाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरून गावकऱ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाचकर यांनी दिला़
मुळा धरण झाल्यानंतर पलिकडची गावे राहुरी तालुक्यात समाविष्ट करण्यात आली आहे़ सरकारी व अन्य कामासाठी गावकऱ्यांना राहुरीशी संपर्क साधावा लागतो़ सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेता पुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी डॉ़जालिंदर घिगे यांनी केली़सव्वा किलोमीटर पुलासाठी सरकारी पातळीवर हालचाली न झाल्याने पुलाचा प्रश्न धूळखात पडल्याचे विजय तमनर यांनी सांगितले़
मोर्चासमोर सभापती अरूण तनपुरे,माजी सरपंच अरूण तनपुरे, हर्षल तनपुरे, प्रदीप पवार, रविंद्र आढाव, वर्षा बाचकर, रत्नमाला मकासरे, सुशिला बर्डे, अलका बाचकर, गवते, पारूबाई चंद यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वैशाली नान्नोर, माजी सरपंच दादा बाचकर, अब्दुल शेख, शत्रुग्न पवार, जयराम माने, संदीप कोकाटे, आप्पासाहेब बाचकर, पाटीलबा बाचकर, रामदास बाचकर आदी उपस्थित होते़