पाथर्डीत धनगर आरक्षणासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:25 PM2018-08-29T13:25:02+5:302018-08-29T13:25:15+5:30
तालुक्यातील सकल धनगर समाजाच्यावतीने एस.टी आरक्षण अंमलबजावणीसाठी आज दुपारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आणण्यात आला होता.
पाथर्डी : तालुक्यातील सकल धनगर समाजाच्यावतीने एस.टी आरक्षण अंमलबजावणीसाठी आज दुपारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आणण्यात आला होता. धनगर समाजाच्या वतीने शहरातील खोलेश्वर महादेव मंदिरात पूजा करण्यात आली त्यानंतर शेळ्या मेंढ्या सह मोर्चा वसंतराव नाईक चौक ते तहसील कार्यालय अश्या मार्गे मागण्या संदर्भात घोषणा बाजीकरत मोर्चा आणण्यात आला होता.आरक्षण संदर्भात मागन्याचे निवेदन तहसीलदार नामदेव पाटील यांना देण्यात आले.
धनगर समाजाच्यावतीने तहसिलदार नामदेव पाटील यांना १८ आॅगस्ट रोजी निवेदन दिले होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजास अनुसूचित जमातीचे दाखले देऊन देण्यात आलेल्या सवलतीची अंमलबजावणी करावी. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे. धनगर आरक्षण आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. समांतर आरक्षणाचे शासनाने काढलेले परिपत्रकामध्ये सुधारणा करण्यात याव्यात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवगार्तून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा परीक्षा देण्यासाठी पूर्वीच्या सवलती कायम ठेवण्यात याव्यात. सर्वोच्च न्यायालयाच्या व केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे आरक्षणाप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी. धनगर आरक्षणा संदर्भात नेमलेली टीस ही संस्था घटनाबाह्य असल्याने कृती समितीवर बंधन कारक नाही. शेळी मेंढी आर्थिक विकास महामंडळास एक हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी गायरान व वनविभागाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यात याव्यात. अहिल्यादेवी मेष महामंडळा मार्फत समाजातील सुशिक्षित बेरोजगारासाठी पंचवीस लाख व्यवसायासाठी अनुदान देण्यात यावे. सैन्य व आदिवासी विकास विभागामध्ये लोकरीपासून बनवलेल्या घोंगड्या खरेदी करण्यात याव्यात. धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरु करावेत अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. यावेळी तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आरक्षण मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.