खासदार गांधी यांच्या बंगल्यासमोर राळेगणसिद्धी ग्रामस्थांचे आंदोलन; भजन म्हणून केला सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 06:44 PM2018-03-28T18:44:04+5:302018-03-28T18:46:42+5:30
हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. गांधी यांच्या बंगल्याच्या गेटमध्ये आंदोलकांनी भजन म्हणून सरकारचा निषेध केला.
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. गांधी यांच्या बंगल्याच्या गेटमध्ये आंदोलकांनी भजन म्हणून सरकारचा निषेध केला.
अण्णांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप सरकारने अण्णांचे उपोषण सोडविण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी येथील ग्रामसभेत सरकारचा तीव्र निषेध करुन गांधी यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ गांधी यांच्या बंगल्यासमोर आले. तेथे ग्रामस्थांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला. आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारातच भजन म्हणण्यास सुरुवात केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्री व पंतप्रधानांना आज संध्याकाळपर्यंत ग्रामस्थांच्या भावना पोहोचविल्या जातील, अण्णांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करायला भाग पाडू, असे आश्वासन खासदार दिलीप गांधी यांनी राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.