मनपाकडून एम्स रुग्णालय विकत घेण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:36+5:302021-05-10T04:20:36+5:30
अहमदनगर : कोराेनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेचे स्वत:चे रुग्णालय असावे, अशी सूचना करत आरोग्य समितीने येथील एम्स रुग्णालय ...
अहमदनगर : कोराेनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेचे स्वत:चे रुग्णालय असावे, अशी सूचना करत आरोग्य समितीने येथील एम्स रुग्णालय विकत घेण्याचा पर्याय पदाधिकारी व प्रशासनासमोर ठेवला आहे. महापौर बाबासाहेब वाकळे हेही याबाबत सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समिती स्थापन केली आहे. या समितीने रविवारी नागापूर औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली असता ऑक्सिजन वापराची तपासणी होणे गरजेचे असल्याचे समोर आले. तसेच महापालिकेने ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याबाबतही चर्चा केली. हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्रकल्प उभारणे शक्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही माहिती घेतल्यानंतर समितीने महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महापालिकेने सावेडी कचरा डेपोच्या जागेत ऑक्सिजन प्रकल्प उभा करावा. हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कमी कालावधीत उभा राहतो. त्यामुळे हा प्रकल्प उभा करण्याबाबतही चर्चा झाली. तसेच तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महापालिकेचे सुसज्ज रुग्णालय असावे, अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली. नव्याने इमारत बांधून रुग्णालय उभे करण्यासाठी वेळ नाही. रुग्णालये विकत घेऊन तिथे अत्यावश्यक मशिनरी बसविण्याबाबत चर्चा झाली. सदस्यांनी एम्स रुग्णालय सध्या शहर बँकेच्या ताब्यात आहे. ही इमारत नवीन आहे. ही इमारत विकत घेतल्यास महापालिकेचे स्वत:चे रुग्णालय उभे राहील. पुणे, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर तिथे आरोग्य सुविधाही निर्माण करता येतील. भविष्यात ते उपयोगी पडेल, अशी सूचना समितीचे अध्यक्ष बोरुडे यांनी मांडली. त्यास इतर सदस्यांनी मान्यता दिली असून, महापौर वाकळे यांनी आयुक्तांशी याबाबत प्राथमिक चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
....
जिल्हा रुग्णालयात निम्म्याच सिलिंडरचा होतोय वापर
जिल्हा रुग्णालयाला पुरविण्यात येणाऱ्या टाक्यांतील निम्म्याच ऑक्सिजनचा वापर होत असून, निम्मा ऑक्सिजन परत येत असल्याची बाब समितीच्या निदर्शनास आली. टाक्यातील संपूर्ण ऑक्सिजनचा वापर करण्याबाबत जिल्हा रुग्णालयाला कळविण्यात येणार असल्याचे बोरुडे यांनी सांगितले. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा केल्या जाणाऱ्या रुग्णालयांना भेटी देऊन तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.