आगामी महापौर निवडणुकीच्या हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:33+5:302021-05-25T04:23:33+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या आगामी महापौर पदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडून आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर प्रस्ताव ...

Movements for the upcoming mayoral election begin | आगामी महापौर निवडणुकीच्या हालचाली सुरू

आगामी महापौर निवडणुकीच्या हालचाली सुरू

अहमदनगर : महापालिकेच्या आगामी महापौर पदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडून आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे. परंतु, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता महापौर निवडणुकीला परवानगी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल येत्या ३० जून रोजी संपत आहे. त्यामुळे महापालिकेत महापौर निवडीचे पडघम वाजू लागलेले आहेत. सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष आपला महापौर बसविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. अगामी महापौर निवडणुकीसाठीचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाने तयार केला असून, तो आयुक्त शंकर गोरे यांना सादर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांकडून महापौर व उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत असतो. परंतु, सध्या कोरोनाने कहर माजविला आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. मध्यंतरी राज्यातील ग्रामपंचायती आणि विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकांमुळे सरकार टीकेचे धनी ठरले. त्यामुळे सरकार आता महापौर निवडणुकीच्या कार्यक्रमाला मंजुरी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौर पदाला मुदतवाढ देता येत नाही. महापौरांचा कार्यकाल हा अडीच वर्षांचा असतो. सध्याच्या महापौरांना मुदतवाढ दिली गेल्यास अनेक कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील महापौरांना कमी कालावधी मिळणार असल्याने या निर्णयाचा दूरगामी परिणाम होईल. त्यामुळे मुदतीत निवडणुका होतील, असे राजकीय जाणकार सांगतात.

...

कोरोनाच्या महामारीत राजकीय धुराळा

शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारीने शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला. अनेकजण कोरोनाशी झुंज देत आहेत. अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. अशा कठीण परिस्थितीत महापौर पदाची निवडणूक जाहीर झाल्यास कोरोनाच्या महासंकटात नगर शहरात राजकीय धुराळा उडणार आहे. नेते, राजकीय पक्षांचे नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

....

महाविकास आघाडीत महाचुरस

महापौर निवडणुकीबाबत संभ्रमाचे वातावरण असले तरी आपल्याच पक्षाचा महापौर बसविण्यासाठी सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आतापासूनच मैदानात उतरले आहेत. राज्यात हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी नगरमध्ये मात्र या तिन्ही पक्षांतच महापौर पदासाठी चुरस पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील महाचुरस राज्यात गाजण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Movements for the upcoming mayoral election begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.