पाण्याच्या प्रश्नावर मात करणा-या गावांवर चित्रपट : भाऊराव क-हाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 08:25 PM2019-02-27T20:25:28+5:302019-02-27T20:28:52+5:30
लोकमत सरपंच अॅवार्ड पुरस्कारामुळे भन्नाट कामे करणारी गावे समजली. पाण्याच्या संकटावर मात करून जलसंधारणात उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांची प्रेरणादायी कथा आगामी चित्रपटांद्वारे मांडणार आहे.
अहमदनगर : लोकमत सरपंच अॅवार्ड पुरस्कारामुळे भन्नाट कामे करणारी गावे समजली. पाण्याच्या संकटावर मात करून जलसंधारणात उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांची प्रेरणादायी कथा आगामी चित्रपटांद्वारे मांडणार आहे. चित्रपट तयार करण्यासाठी अशा गावांचा सहभागी घेऊ, अशी घोषणा चित्रपट लेखक-दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी केली.
लोकमत सरपंच अर्वार्ड पुरस्कारांचे नगर येथे बुधवारी एका शानदार कार्यक्रमात वितरण झाले. या कार्यक्रमात क-हाडे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी क-हाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच तथा राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गिते, हवामानतज्ज्ञ प्रा. डॉ. बी. एन. शिंदे, सीएसआरडी या संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पटारे, नगर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे आदी उपस्थित होते.
या वेळी लोकमत अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख सुधीर लंके यांनी ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक क-हाडे यांची मुलाखत घेतली. क-हाडे म्हणाले, धवल क्रांती, हरित क्रांती, औद्योगिक क्रांती झाली तरी गावे सुधारली नाहीत. हीच मध्यवर्ती कल्पना घेऊन ख्वाडा, बबन हे चित्रपट काढले. विकासाला आड येणारे ग्रामीण राजकारण चित्रपटातून मांडले. माणूस उभा करण्यासाठी गावाने प्रयत्न करावेत, ही भावना चित्रपटामागे होती. ग्रामपंचायत निवडणुकीत लढलो, मात्र जिंकलो नसलो तरी अनुभव मिळाला. सरपंचांना पंतप्रधानाइतकाच अधिकार आहे. सरपंचांनी चांगल्या विचाराने कामे केली तर देश सुधारण्यास वेळ लागणार नाही.
यावेळी पोपटराव पवार म्हणाले, वाळू ही आंतरराष्टीय समस्या आहे. वाळू वाचवून अनेक गावांनी उत्तम काम केले आहे. वाळूच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने चांगली मांडणी केली आहे. व्यसनाधिनतेमुळे गावात असुरक्षिततेची भावना आहे. गावे पाणीदार होतील, स्वच्छही होतील, मात्र ती संस्कारक्षम करण्याची गरज आहे. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गिते म्हणाले, सरपंचांमधून एक आमदार झाला पाहिजे, असा कायदा तयार व्हावा. सरपंचांना मानधन मिळावे, यासाठी सरपंच परिषद शासनस्तरावर लढा देणार आहोत. प्रा. बी. एन. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी त्यांच्या निम्म्या शेतीवर झाडे लावली तर जागेवरच पाऊस येईल. कमी जागेत पाझर तलाव तयार करण्याचा आराखडाही शिंदे यांनी मांडला.