खासदार गांधी, रावसाहेब दानवे यांनी नगरमध्ये भाजप विकला: बंडखोरांकडून टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 01:49 PM2018-12-05T13:49:06+5:302018-12-05T13:49:20+5:30
केडगावमध्ये भाजपने एका रात्रीत कोतकर समर्थकांना पक्षात घेतले, दुसरीकडे पक्षात बंडखोरी केली म्हणून सातजणांना आज निलंबित करण्यात आले आहे.
अहमदनगर: केडगावमध्ये भाजपने एका रात्रीत कोतकर समर्थकांना पक्षात घेतले, दुसरीकडे पक्षात बंडखोरी केली म्हणून सातजणांना आज निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत पक्षात जोरदार संघर्ष सुरु झाला आहे. या बंडखोरांनी विविध प्रभागात भाजपसमोर आव्हान निर्माण केले आहे. खासदार दिलीप गांधी, रावसाहेब दानवे यांनी नगरमध्ये भाजप विकला, अशी टीका बंडखोरांनी केली आहे.
भाजपने मिलिंद गंधे, मनिषा राजेंद्र काळे-बारस्कर, गायत्री चोरडीया, प्रितेश रुपचंद गुगळे, प्रतीक बारस्कर, शिवाजी बाळासाहेब लोंढे, आशाताई साहेबराव विधाते यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांनी हा आदेश काढला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या अनुमतीने सहा वर्षासाठी हे निलंबन करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या निलंबनाची भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
शिक्षित आहोत हा गुन्हा आहे का? : मनिषा काळे
निलंबनाबाबत मनिषा काळे म्हणाल्या, ‘आम्ही काय गुन्हा केला? हे एकदा खासदार गांधींनी जाहीर करावे. उच्चशिक्षित असताना पक्षाकडे आम्ही उमेदवारी मागणे हा गुन्हा आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात सुशिक्षित युवकांनी, महिलांनी राजकारण यावे. आपण उच्चशिक्षित आहोत, खेळाडू आहोत. पतीही उच्चशिक्षित आहेत. मात्र, आम्हाला जाणीवपूर्वक उमेदवारी डावलण्यात आली. मागील पंचवार्षिकमध्ये विकासाची कामे केली. सावेडीला सांस्कृतिक चेहरा प्राप्त करुन देण्यासाठी कार्यक्रम घेतले. असे असतानाही गांधी यांनी उमेदवारी नाकारली. पक्ष कुणाचीही जहागिरी नाही. काही घरात दोन-दोन उमेदवाऱ्या दिल्या. ही कोणती पक्षशिस्त आहे? आम्ही जनतेच्या न्यायालयात आहोत व मोदींना मानणारे आहोत. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात न्याय मागत आहोत. गांधी यांनी स्वार्थासाठी कारवाई केली असली तरी आमची भाजपसोबत निष्ठा आहे व ती कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया या निलंबनाबाबत मनिषा काळे यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नगरमध्ये काय सुरु आहे? त्यावर सविस्तर प्रकाश टाकणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
जनताच न्यायनिवाडा करेल: गंधे
गंधे म्हणाले, पक्षाने आपणावर जो अन्याय केला तो अगोदरच जनतेसमोर मांडलेला आहे. माझ्यावरील अन्याय दूर करण्याचे धोरण जनताच घेईल. त्यातून पक्षाला योग्य तो संदेश मिळेल.
पक्षात आता ‘दानव’ आले आहेत: लोंढे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे ‘दानव’ असल्याची प्रचिती नगरमध्ये आली आहे. दानवे, गांधी यांनी नगरमध्ये पक्ष विकला आहे. खासदार दिलीप गांधी यांनाही या सर्व बाबीचे उत्तर या व पुढील निवडणुकीतही मिळेल. आम्ही पक्षासाठी रक्त सांडले आहे. केडगावमध्ये टोकाचा संघर्ष असताना आम्ही पक्षासाठी दिवसरात्र झगडलो. त्यावेळी दानवे, गांधी कोठे गेले होते? आज स्वार्थासाठी त्यांनी एका रात्रीत कोतकर समर्थकांना पक्षात पावन करुन घेत तिकिटे विकली. ही पक्षशिस्त व पक्षनिष्ठा आहे का? हिंमत असेल तर गांधी, दानवे यांनी आपणाला केडगावमध्ये पराभूत करुन दाखवावे. गांधी यांनी प्रा. ना. स. फरांदे यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली नव्हती. त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले. तेव्हा त्यांची स्वत:ची पक्षनिष्ठा कोठे गेली होती. गांधी हे जातीवादी राजकारण करत आहेत. फरांदे सर का पराभूत झाले? हे गांधी यांनी जाहीर करावे. आपण शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणीचे आहोत. हे त्यांना खपत नाही. गांधी यांना या सर्व बाबींची किंमत लोकसभा निवडणुकीत मोजावी लागेल. ते लोकांना गृहीत धरु लागले आहेत.