खासदार लोखंडे कोरोना संकटात गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:14+5:302021-04-26T04:18:14+5:30
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी खासदार लोखंडे हे कोरोनाविरूद्धच्या लढाईतून गायब असल्याचा आरोप केला आहे. श्रीरामपूरकरांना त्यांची साधी ...
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी खासदार लोखंडे हे कोरोनाविरूद्धच्या लढाईतून गायब असल्याचा आरोप केला आहे. श्रीरामपूरकरांना त्यांची साधी भेट मिळणे कठीण असून, मदत तर खूपच दूर असा टोला त्यांनी लगावला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. खासदार लोखंडे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. या सत्तेतून तालुक्यातील जनतेला कोणतीही मदत पुरविण्यास लोखंडे हे अपयशी ठरले आहेत. संकटकाळी गोरगरीब जनता वाऱ्यावर सोडली आहे.
नगर दक्षिणेतील खासदार डॉ. सुजय विखे यांनी रेमडेसिविरचा साठा उपलब्ध करून दिला. जिल्ह्यातील अनेक रुग्णांना मदत केली. जिल्ह्यातील आमदार महोदयांनीही मतदारसंघात कोरोना उपचार केंद्रे उभारली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा प्रदान केली. रुग्णांच्या कुटुंबीयांच्या दु:खात ते सहभागी होत आहेत.
श्रीरामपूर तालुक्यात प्रथमच निवडून आलेले आमदार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष जनतेला आधार देत आहेत. मात्र खासदारांची कुठलीही मदत मतदारसंघातील जनतेला अद्यापपर्यंत झालेली नाही, अशी टीका शिंदे यांनी केली.
रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर व रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळत नाहीत. त्यामुळे तरुणांचे मृत्यू होत आहेत. ही स्थिती भयावह आहे. विशेष म्हणजे खासदार लोखंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जनतेला आरोग्य सुविधा देण्याची घोषणा केली होती, मात्र ऐन संकटात त्यांना घोषणेचा विसर पडला आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.
---