‘त्या’ वक्तव्यावर खासदार सुजय विखे यांनी माफी मागावी : दीपाली सय्यद यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 02:08 PM2019-09-15T14:08:17+5:302019-09-15T18:27:43+5:30
खासदार सुजय विखे यांनी साकाळाई योजनेच्या अनुषंगाने माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. याबाबत त्यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिला आहे़
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्यावेळी पाठिंबा मागण्यासाठी आलेल्या खासदार सुजय विखे यांनी साकाळाई योजनेच्या अनुषंगाने माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. याबाबत त्यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिला आहे.
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना खा़ विखे म्हणाले होते़ ‘तुमच्याकडे देखणा माणूस आला तर त्याला फक्त पहायला जात जा़ साकळाई योजना फक्त सुजय विखेच करू शकतो़ अन्य कोणाचे ते काम नाही’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली होती.
विखेंच्या या वक्तव्याबाबत दीपाली सय्यद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत विखेंबाबत संताप व्यक्त केला़ त्या म्हणाल्या, सुजय विखे हे सुसंस्कारित घराण्यातील असून ते डॉक्टर आणि आता खासदार आहेत़ मात्र महिलांबाबत ते असे वक्तव्य करीत असतील तर त्यांना स्वत:ला नेता म्हणून घेण्याचा काहीच अधिकार नाही़ त्यांनाही आई, बहीण, पत्नी आहे़ लोकसभा निवडणुकीच्यावेळी विखे यांनी बहीण म्हणून माझ्याकडे पाठिंबा मागितला होता़ त्यांना मी पाठिंबाही दिला होता़ मी रिंगणात उतरले म्हणून साकळाई योजनेचा विषय समोर आला आहे़ ही योजना मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे़ योजनेच्या सर्वेक्षणासाठी मुख्यमंत्री यांनी २ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सुजय विखेंचे मात्र इतर नेत्यांपेक्षा वेगळे आहे. मीच कामे करणार, माझ्यामुळेच हे साकळाई होणार असा त्यांना इगो आहे़ विकास कामे करण्यासाठी त्यांना कुणी अडविले नाही. मात्र महिलांचा अपमान करण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला? असा सवाल सय्यद यांनी उपस्थित करीत विखे यांनी माफी मागावी अशी मागणी केली़
--तर श्रीगोंंद्यातून उमेदवार
स्थानिक नेते असेच वागत राहिले तर श्रीगोंदा मतदारसंघातून साकळाई पाणी योजना कृती समिती उमेदवार उभा करेल़, असा इशाराही सय्यद यांनी यावेळी दिला़