खानापूर वसतिगृहाची अवस्था पाहून खासदार संतापले; अस्वच्छता, मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:49 PM2020-03-15T12:49:01+5:302020-03-15T12:49:58+5:30
खानापूर आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहास खासदार सदाशिव लोखंडे यांनी शनिवारी दुपारी अचानक भेट दिली. येथील अस्वच्छता पाहून लोखंडे प्रशासनावर चांगलेच संतापले.
अकोले : खानापूर आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहास खासदार सदाशिव लोखंडे यांनी शनिवारी दुपारी अचानक भेट दिली. येथील अस्वच्छता पाहून लोखंडे प्रशासनावर चांगलेच संतापले.
अस्वच्छता, उघड्या तुंबलेल्या गटारी, स्वच्छतागृहांची दुर्दशा, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची थोटके आणि रिकामी पाकिटे, गुटक्याच्या रिकाम्या पुड्या असा वसतिगृहाचा झालेला ‘उर्किडा’ पाहून संताप व्यक्त केला. तात्त्काळ खासदारांनी आदिवासी आयुक्तांना फोनवरुन येथील अस्वच्छतेची माहिती दिली. अधीक्षक व सफाई कामगारांना निलंबित करण्याची सूचना केली.
वसतिगृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त मुले येथे आहेत. वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. ड्रेनेजची सोय नाही, पाणी खराब असून त्यामुळे अंगावर पुरळ उठते अशी कैफियत विद्यार्थ्यांनी मांडली. वसतिगृहाच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून अधीक्षक, सफाई कामगार व अन्य कर्मचारी येथे कधीच दिसत नाहीत अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. बेसीनचे तुटलेले नळ, स्वच्छता गृहाची तुटलेली दारे पाहून खासदार यांनी संताप व्यक्त केला. सरकार पैसे खर्च करते ते, जातात कुठे? असा सवाल लोखंडे यांनी उपस्थित केला. मच्छिंद्र धुमाळ, महेश देशमुख, महेश नवले, प्रदीप हासे उपस्थित होते.
वसतिगृहाची क्षमता १२५च्या दरम्यान आहे. त्यात जवळपास २०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.
अधीक्षक व दोन सफाई कामगार तेथे असतात. ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता. गटार व ड्रेनेजच्या कामासाठी २० लाख रुपयांचे काम मंजूर असून सार्वजनिक बांधकामाकडून हे काम सुरु आहे, असे राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे ठुबे, प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी सांगितले.