MPSC Exam Postponed : परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विश्वासघातकी : राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 08:06 PM2021-03-11T20:06:47+5:302021-03-11T20:08:11+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा
शिर्डी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.
विखे म्हणाले, कोरोनाच्या कारणाने यापुर्वी सलग पाचवेळा परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलण्याचा निर्णय केला होता. आता झालेल्या निर्णयाप्रमाणे १४ मार्च रोजी या परीक्षा होतील, या आशेने विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत होते. परंतू सरकारने अचानक परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय करून विद्यार्थ्यासमोर अडचण निर्माण केली. परीक्षेच्या तयारीकरीता बहुतांशी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जावून राहात आहेत. यासाठी त्यांना खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. सलग पाचवेळा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आता हवालदिल झाले आहेत. त्यातच या परीक्षेसाठी वयाची अट असल्याने परीक्षा जेवढ्या लांबणीवर गेल्यास वयोमर्यादेच्या अटीमुळे विद्यार्थांना भविष्यात या परीक्षेस बसणेही अडचणीचे ठरेल. याचे भान राज्य सरकारने ठेवायला हवे होते. परंतू या सरकारकडे तशी संवेदनशीलता नसल्याने विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात घालण्याचे पाप राज्य सरकार करीत आहे. केंद्र सरकारने कोरोनाची सर्व नियमावली पाळून युपीएसीच्या परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केल्या. आरोग्य विभागाची परीक्षा राज्य सरकारने घेतली, तेव्हा कोरोना नव्हता का. सरकार फक्त आपली जबाबदारी झटकण्याचे काम करीत आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार न केल्यास केल्यास राज्यात विद्यार्थाचा उद्रेक झाल्याशिवाय राहाणार नाही.