अहमदनगर जिल्ह्यातील ३७ हजार कृषिपंपांची वीज महावितरणने तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 07:24 PM2017-12-26T19:24:42+5:302017-12-26T19:30:21+5:30
वीजबिलाची थकबाकी न भरल्याने महावितरणने शेतकºयांच्या कृषिपंपांवर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांची वीज खंडित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : वीजबिलाची थकबाकी न भरल्याने महावितरणने शेतकºयांच्या कृषिपंपांवर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होणार आहे. चालू बील भरून शेतक-यांनी कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५७ हजार शेतकºयांकडे २ हजार २८५ कोटींची थकबाकी आहे. त्यात मूळ थकबाकी १ हजार ३३८ कोटींची असून उर्वरित दंड व व्याज आहे. थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना आणली. या योजनेद्वारे शेतक-यांना त्यांच्या थकीत वीजबिलातील दंड व व्याज वगळून मूळ रकमेचे सुलभ हप्ते चालू बिलासह वर्षभरात भरण्याची सुविधा देण्यात आली. तसेच वीज बिलाबाबतच्या सर्वच शंकांचे निरसन करण्यासाठी डिसेंबर महिन्यात फिडरनिहाय कृषिपंप ग्राहकांच्या शिबिरांचेही नियोजन करण्यात आले होते.
३१ नोव्हेंबरपर्यंत मुदत असलेल्या या योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील ८८ हजार शेतक-यांनी सहभाग नोंदवला व चालू बिलाच्या रकमेपोटी ३५ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला. परंतु अजूनही २ लाख ६९ हजार शेतक-यांकडे २ हजार २५० कोटींची थकबाकी आहे.
या योजनेत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १ डिसेंबरपासून महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुकानिहाय थकबाकी असलेल्या कृषिपंपाची वीज खंडित करण्यास प्रारंभ झाला असून २५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांवर कारवाई झाली आहे.
चालू बील भरून कारवाई टाळा
शेतक-यांंनी चालू बील किंवा ३ ते ५ हजार रूपये भरून कारवाई टाळावी. पैसेच भरले नाही तर वीज खंडित केल्याशिवाय पर्याय नाही. बिलाबाबत काही शंका, दुरूस्ती असेल तर स्थानिक उपकार्यालयात संपर्क करावा, तेथे कक्ष स्थापन केलेले आहेत. सर्व शंकांचे निरसन होईल. - अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता, महावितरण