महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:21 AM2021-05-12T04:21:12+5:302021-05-12T04:21:12+5:30
कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली असून, त्यामध्ये सर्व नागरिक घरी असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी फक्त ...
कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली असून, त्यामध्ये सर्व नागरिक घरी असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी फक्त सेवेत आहेत. त्यामुळे कुठलाही वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी या महामारीच्या स्थितीत महावितरणचे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. परंतु विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करायचे असल्यास हे कार्य करण्यासाठी त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतो. त्यामध्ये सर्व भागच वा विद्युतवाहिनी खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ बंद राहू नये म्हणून उंच वाढत असलेल्या झाडाच्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इन्सुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहित्रांचे ऑइल तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले लाइटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉइंट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली, जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे अशा प्रकारची अनेक कामे गतीने केली जातात. मात्र सदर कामे गतीने करीत असताना काही काळासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो. महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सर्व अभियंते व कर्मचारी यांना कोविड अनुषंगाने उपाययोजना व सुरक्षितता बाळगून ही कामे योग्य ती काळजी घेऊन गतीने करण्याबाबत निर्देशित केले आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून, तरी ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.