दुकाने बंद असल्याने मुहुर्ताची खरेदी हुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:22+5:302021-04-13T04:20:22+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही गुढीपाडव्यावर आर्थिक अरिष्ट ओढवले आहे. मिनी लॉकडाऊमुळे दुकाने बंद असल्याने अनेकांना मुहुर्ताची खरेदी ...
अहमदनगर : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही गुढीपाडव्यावर आर्थिक अरिष्ट ओढवले आहे. मिनी लॉकडाऊमुळे दुकाने बंद असल्याने अनेकांना मुहुर्ताची खरेदी करता येणार नाही. तर विक्री होणार नसल्याने नगरच्या बाजारपेठेतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. काही दुकाने उघडी तर काही दुकाने बंद ठेवली जात असल्याने व्यापाऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.
गतवर्षी १२ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. २५ मार्चला गुढीपाडव्याचा सण होता. त्यानंतर एप्रिलमध्ये अक्षय तृतीया हा सण होता. या दोन्ही सणांना कडक लॉकडाऊन असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. यंदाही मिनी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर मंगळवारी पहिला सण गुढीपाडवा आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने यादिवशी सोने, चांदीचे दागिने, मोबाईल, टीव्ही, फ्रीज अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, गृह खरेदी, दुचाकी, चारचाकी वाहने आदी प्रकारची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. यंदा मात्र सर्व दुकाने बंद असल्याने मुहुर्ताची खरेदी होणार नसल्याने अनेकांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.
-------------
गतवर्षी गुढीपाडवा, अक्षय तृतीया, लग्नसराईचा कालावधी लॉकडाऊनमध्ये गेला. यावेळी मिनी लॉकडाऊनमध्ये गुढीपाडवा आला आहे. किराणा, भाजी, दुधासह इतर दुकाने सुरू, राजकीय सभा, समारंभ सुरू आहेत. लग्नालाही मर्यादित लोकांसह परवानगी दिलेली आहे. मात्र दुकानदारांमुळेच कोरोना पसरतो, असा गैरसमज करून सर्वच दुकाने बंद केली आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शासनाने दुजाभाव न करता एक तर सर्वच सुरू ठेवावे, अन्यथा सर्वच बंद करावे. अशा अर्धवट नियमांमुळे कोरोनाची साखळी तुटण्याची शक्यता कमीच आहे. यंदाही कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
-सागर कायगावकर, सराफा व्यावसायिक
------------------
गुढीपाडव्याच्या दिवशी दोन दिवसांपासून शंभरच्यावर ग्राहकांचे फोन आले आहेत. त्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी मोबाईल खरेदी करायचा आहे. मात्र मिनी लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गुढीपाडव्याला मोबाईलची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. यंदा मात्र मोठे नुकसान झाले आहे.
-अजित जगताप, अध्यक्ष, मोबाईल विक्रेते असोसिएशन
---------------
दरवर्षी गुढीपाडव्याला चारशे ते पाचशे दुचाकी वाहनांची विक्री होते. यंदा मात्र मिनी लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. गेल्या पाच तारखेपासून शोरुम बंद असल्याने कोणाचीही बुकिंग झालेली नाही. कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
-रामदास खांदवे, दुचाकी शोरुमचे व्यवस्थापक
-----------------
लॉकडाऊनबाबत व्यापाऱ्यांचे प्रश्न
इतर राज्यात, पंढरपूरच्या राजकीय सभेतील गर्दी कशी चालते ?
किराणा दुकाने सुरू आहेत. रस्त्यावर गर्दी आहे. तिथे कोरोना कसा रोखला जातो?
भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी आहे, तिथे कोरोनाचा प्रसार कसा होत नाही ?
सर्व नियमांचे पालन करणाऱ्या दुकानदारांकडूनच कोरोना कसा पसरतो ?
दुकाने बंद ठेवू, सरकार भरपाई किंवा करमाफी, वीजबिल माफी देणार का ?
खेड्यापाड्यात सर्व दुकाने सुरू आहेत, मग शहरातीलच बंद का ?
लग्नासाठी परवानगी दिली, मग त्यांनी खरेदी कोठून करायची ?
परिस्थिती गंभीर आहे, नियम मात्र सर्वांना सारखे का नकोत ?