मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासक नियुक्त; सहकार विभागाची औरंगाबाद खंडपीठात माहिती
By शिवाजी पवार | Published: May 2, 2023 07:20 PM2023-05-02T19:20:27+5:302023-05-02T19:21:02+5:30
खंडपीठात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप व अमृत धुमाळ यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती.
श्रीरामपूर : येथील मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती सहकार विभागाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिली.
खंडपीठात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप व अमृत धुमाळ यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सहकार विभागाच्या वतीने खंडपीठात मंगळवारी म्हणणे सादर करण्यात आले. त्यात संस्थेवर राहाता येथील सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांची प्राधिकृत अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली. याचिकेचे काम विधीज्ञ अजित काळे हे पाहत आहेत. त्यांना विधीज्ञ साक्षी काळे व प्रतीक तलवार हे सहाय्य करत आहेत.
संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत ३ जानेवारी २०२१ मध्ये संपली होती. त्यामुळे सहकार विभागाने निवडणूक प्रक्रिया राबवत अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रति सभासद १४८ रुपये या प्रमाणे संस्थेच्या एक लाख ५५ हजार ५८८ सभासदांचे दोन कोटी ३३ लाख ७१ हजार रुपयांची मागणी संस्थेकडे केली होती. ही रक्कम जिल्हा सहकारी बँकेच्या नगर येथील खात्यावर भरून चलनाची प्रत कार्यालयाला सादर करण्याचे आदेश प्राधिकरणाने बजावले होते. मात्र संस्थेने हे पैसे भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे हे पैसे सहकार प्राधिकरणाला वेळेत मिळू शकले नाहीत. त्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ बेकायदारित्या तेथे कार्यरत असल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे.
सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ७७ अ नुसार बरखास्त संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. अधिकार्यांचा कालावधी हा एक वर्षाकरिता राहणार आहे. या दरम्यान संस्थेच्या निवडणुकीकरिता खर्च वसूल केला जाणार आहे. मुळा प्रवरा वीज संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार डॉ.सुजय विखे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राहाता, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील प्रमुख पक्षाचे संचालक मंडळ कार्यरत होते. मागील निवडणुकीवेळी सर्व नेते एकत्र आल्याचे पहायला मिळाले होते.