जागरण गोंधळ पार्टीत रमणारा मुंबईचा पोलीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:34 PM2019-10-27T12:34:35+5:302019-10-27T12:34:45+5:30

मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे.

Mumbai police enjoying a wake-up party | जागरण गोंधळ पार्टीत रमणारा मुंबईचा पोलीस 

जागरण गोंधळ पार्टीत रमणारा मुंबईचा पोलीस 

बाळासाहेब काकडे। 
श्रीगोंदा : मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे.
अविनाश हा २०१० ला मुंबई पोलीस दलात भरती झाला. सध्या तो कमांडो पथकात काम करत आहे. मात्र ज्या जागरण गोंधळ पार्टीने शिकण्यासाठी बळ दिले. त्या जागरण गोंधळ पार्टीत मुंबईचा हा कमांडो कधी वाघ्या तर कधी संबळ वादकाचे काम करत आहे. देऊळगाव येथील विलास व अनुसया जाधव यांचा पिढीजात जागरण गोंधळ पार्टीचा व्यवसाय आहे. त्यांना दीपाली व अविनाश ही दोन मुले आहेत. अविनाश दोन वर्षाचा असतानाच विलास यांचे निधन झाले. अनुसया यांनी जागरण गोंधळामध्ये मुरळीचे काम चालू ठेवले. या माध्यमातूनच त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.
अविनाश हा लहानपणी सुट्टीत जागरण गोंधळ पार्टीत जायचा. देऊळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी बारामती येथील दादा चंदर गोसावी (काका) यांच्याकडे पाठवले. अकरावी, बारावी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात झाली. अविनाश हा मुंबई पोलीस दलात भरती झाला. अविनाशने मुंबई विद्यापीठात बी. ए. केले. सध्या तो क्यूआरटी पथकात कमांडो म्हणून सेवा करीत आहे. त्याची बहीण दीपालीचा विवाह झाला असून तीही श्रीगोंदा शहरात ब्युटी पार्लरचे काम करते. अविनाशचा पदवीधर प्राचीबरोबर विवाह झाला. ती स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. अविनाश लहानपणापासून जागरण गोंधळ पार्टीत काम करण्याची आवड आहे. त्याने लोककला जोपासण्यासाठी जागरण गोंधळ पार्टीत काम करणे सुरूच ठेवले आहे. तो काम सांभाळून या पार्टीत काम करतो. 
सुटीत जागरण गोंधळाचे काम
 किल्लारीला भूकंप झाला. त्या दरम्यान पतीचे निधन झाले. अविनाश व दीपालीला गरिबीचे चटके बसले. तरही मुले शिकली. अविनाश मुंबईत पोलीस झाला. तो गावी सुटीला आला की माझ्याबरोबर जागरण गोंधळ पार्टीत काम करतो, असे देऊळगावच्या अनुसया धुमाळ यांनी सांगितले. 
आईसाठी शिकलो लोककला
माझ्या वडिलांचा लहानपणीच मृत्यू झाला. आईने जागरण गोंधळ पार्टीत असताना मला मुरळी, संबळ वादन, वाघ्याचे काम शिकविले. त्यामुळे तिला मदत व्हायची. याशिवाय काकांनी आधार दिला. त्यामुळे पोलीस दलात जाऊ शकलो. आज त्यांना आधार व्हावा व लोककला जोपण्यासाठी सुटीच्या काळात जागरण गोंधळ पार्टीत काम करतो, असे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी अविनाश धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़.

Web Title: Mumbai police enjoying a wake-up party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.