अहमदनगर: कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन
By अरुण वाघमोडे | Published: April 26, 2023 04:53 PM2023-04-26T16:53:23+5:302023-04-26T16:53:36+5:30
अकरा गंभीर मुद्दे उपस्थित करत सखोल चौकशीसाठी तत्काळ समिती नेमण्याची मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
अहमदनगर: वेतन दरवाढीच्या मागणीसाठी रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांनी संतप्त होत अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी मुंडन आंदोलन केले.
यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळ अध्यक्ष नितीन कवले व मंडळाचे सचिव तुषार बोरसे यांच्या रभाराबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. अकरा गंभीर मुद्दे उपस्थित करत सखोल चौकशीसाठी तत्काळ समिती नेमण्याची मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
आठ दिवसांच्या आत समिती न नेमल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील दोन वर्षांपासून वेतन दरवाढीसाठी कामगार न्याय मागत आहेत. फेब्रुवारी महिन्यात यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर अंमलबजावणीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार ठेकेदारांच्या विरुद्ध सुमारे साडेतीन कोटींच्या वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली होती.
मात्र ठेकेदारांनी या वसुलीला विरोध करत बंद पुकारण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी आयोजित बैठकीला आंदोलनाशी व वेतन दरवाढीशी संबंध नसणाऱ्या तथाकथित टोळी प्रमुखांना व एका संघटनेला निमंत्रित करण्यात आले होते. यावर कामगारांनी जोरदार आक्षेप घेतला. वेतन वाढ मागणाऱ्या आंदोलनकर्त्या कामगारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले असे म्हणत संतप्त कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कवले, मंडळाचे सचिव बोरसे व ठेकेदार यांच्यामध्ये संगनमत सुरू असल्याचा आरोप केला आहे.