महापालिका : साडेसातशे कोटीचे अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:03 PM2019-06-25T13:03:03+5:302019-06-25T13:03:30+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता, यामुळे गेल्या पाच महिन्यापासून लालफितीत अडकलेले महापालिकेचे चालूवर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे़
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता, यामुळे गेल्या पाच महिन्यापासून लालफितीत अडकलेले महापालिकेचे चालूवर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे़ यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास सात महिने राहिले असून, या सात महिन्यांत साडेसातशे कोटी खर्चाचे आव्हान पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे़
महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासनाने फेब्रुवारीमध्ये स्थायी समितीला सादर केले होते़ स्थायी समितीत अंदाजपत्रकावर चर्चा झाली़ सदस्यांनी शिफारशी सुचविल्या़ अंदाजपत्रक शिफारशींसह अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत सादर करणे बंधनकारक असते़ अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर होण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली़ त्यामुळे महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा होऊ शकली नाही़ लोकसभेची आचारसंहिता २७ मे रोजी संपुष्टात आली़
आचारसंहिता संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय सभा होईल, अशी आशा नगरसेवकांना होती़ मात्र सभा झाली नाही़ सभेसाठी महापौरांनी मंगळवारचा मुहूर्त काढला असून, या सभेत स्थायी समितीचे सभापती मुद्दसर शेख महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत़ सत्ताधाºयांच्या काळातील ही पहिलीच अर्थसंकल्पीय सभा आहे़
सेना-भाजपतील दुफळी कायम
राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली़ दरम्यानच्या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपाचे शहरातील पदाधिकारी एका व्यासपीठावर आले़ परंतु, निवडणूक संपल्यानंतर सेना-भाजपात पुन्हा वाद उफाळून आला आहे़ महापालिका निवडणुकीनंतरची ही पहिलीच अर्थसंकल्पीय सभा आहे़ या सभेपूर्वी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांत समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू होता़ परंतु, अद्याप समन्वय झालेला नाही़ अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर अभ्यासासाठी वेळ दिला जाणार आहे़ या काळात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक होईल, असा दावा सेना-भाजपाच्या नगरसेवकांकडून केला जात आहे़ परंतु, समन्वय बैठक न झाल्याने सभागृहात सेना आक्रमक पवित्रा घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे़