महापालिकेला माहिती नाहीत शहरातील गटारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:51 PM2019-06-04T16:51:43+5:302019-06-04T16:52:54+5:30
शहरातील अंतर्गत गटारी नियमित स्वच्छ केल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जातो़
अहमदनगर : शहरातील अंतर्गत गटारी नियमित स्वच्छ केल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जातो़ मात्र शहरातील गटारींची संख्या किती, याची माहितीच या विभागाकडे नाही़ यावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाचे काम कसे चालते, याची कल्पना न केलेलीच बरी़
महापालिकेत सध्या आपत्ती व्यवस्थापन हा एकमेव कार्यक्रम सुरू आहे़ पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे़ मोठे नाले जेसीबी पोकलेनच्या सहाय्याने स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे़ मात्र अंतर्गत गटारी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी नुकताच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला़ यावेळी शहरातील अंतर्गत गटारी किती स्वच्छ केल्या, अशी विचारणा आरोग्य विभागाकडे केली़ आरोग्य विभागाने ५० टक्के काम पूर्ण झाल्याचे मोघमछाप उत्तर दिले़ ही बाब व्दिवेदी यांना खटकली़ त्यांनी साफ केलेल्या नाली तपासण्याचा आदेश जारी केला़
उपायुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी मोहीम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे़ यासंदर्भात उपायुक्त पवार यांच्याशी संपर्क साधला असता शहरात किती अंतर्गत गटारी आहेत, यापैकी बंद किती आणि उघड्या किती, याची आकडेवारी असणे आवश्यक आहे़ पण ही माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही़ त्यामुळे गटारी किती साफ झाल्या आणि किती राहिल्या, याची माहिती मिळणे कठीण झाले आहे, असे पवार म्हणाले़ शहरातील गटारी किती साफ झाल्या याची पाहणी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले़
उपायुक्त सुनील पवार यांच्यासह प्रभाग अधिकारी शहरातील वंजार गल्ली भागातील गटारींची पाहणी करण्यासाठी गेले़ त्यांनी नागरिकांकडे विचारणा केली असता, साहेब, गटार बांधून बरेच वर्षे झाले़ मात्र गटार साफ करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी आले नाहीत, असे नागरिकांकडून सांगण्यात आले़
सावेडीतील २६ पैकी एकच गटार साफ
सावेडी प्रभाग कार्यालयांतर्गत एकूण गटारी २६ आहेत़ त्या सर्व साफ केल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले़ प्रत्यक्षात उपायुक्तांनी माहिती घेतली असता यापैकी एकच गटार साफ केल्याचे समोर आले़