नगर महापालिका पोटनिवडणूक : काँग्रेस, सेनेची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 06:47 PM2018-03-15T18:47:52+5:302018-03-15T18:49:26+5:30
नगर महापालिका पोटनिवडणुकीचा धूमधडाका गुरुवारपासून सुरु झाला आहे. मनपाच्या माळीवाडा येथील जुन्या कार्यालयात बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
केडगाव : नगर महापालिका पोटनिवडणुकीचा धूमधडाका गुरुवारपासून सुरु झाला आहे. मनपाच्या माळीवाडा येथील जुन्या कार्यालयात बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
केडगावातील प्रभाग क्रमांक ३२ मधील नगरसेवक संदीप कोतकर यांचे नगरसेवकपद रद्द केल्याने एका जागेसाठी निवडणूक होत आहे. अशोक साबळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. माळीवाडा येथील जुन्या मनपाच्या कार्यालयात बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र तीन उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. २० मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येणार आहे़ २१ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून २३ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेसकडून या जागेसाठी विशाल कोतकर व गणेश सातपुते हे दोघे इच्छुक असून शिवसेनेकडून विजय पठारे व अजय अजबे हे दोन उमेदवार इच्छुक आहेत. भाजप या निवडणुकीत उतरणार की नाही याचा निर्णय अद्याप झाला नसल्याने सध्या त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. दरम्यान भाजपची खासदार दिलीप गांधी यांच्या समवेत बैठक झाली़ मात्र यात कोणताच निर्णय झाला नाही. शुक्रवारी भाजपची पुन्हा बैठक होणार असून यात निवडणुकीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
ज्या प्रभागात ही पोटनिवडणूक होत आहे, ती जागा काँग्रेसची आहे. यामुळे राष्ट्रवादीने येथे काँग्रेस उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
-भरत गारूडकर, केडगाव विभाग अध्यक्ष राष्ट्रवादी
खा. दिलीप गांधी यांच्या समवेत भाजपची बैठक झाली. दोन -तीन इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. मात्र याबाबत अंतिम निर्णय शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत होणार आहे.
-शरद ठुबे, केडगाव भाजप मंडल अध्यक्ष