कामगारांनी उधळली महापालिकेच्या स्थायी समितीची सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:54 PM2018-10-29T12:54:01+5:302018-10-29T12:56:33+5:30
सानुग्रह अनुदान न दिल्याने व 103 जणांना पदोन्नती मंजूर न केल्याने युनियनने महापालिकेचे कामकाज बंद केले आहे.
अहमदनगर - सानुग्रह अनुदान न दिल्याने व 103 जणांना पदोन्नती मंजूर न केल्याने युनियनने महापालिकेचे कामकाज बंद केले आहे. अनुदान दिल्याशिवाय सभा चालू देणार नाही असा इशारा दिल्याने सभापती बाबासाहेब वाकळे यांनी दुपारी चारपर्यंत सभा तहकूब केली.
महापालिका कर्मचाऱ्यांना साडेसात हजार रुपये प्रत्येकी देण्याचा निर्णय झाला. मात्र आठ दिवसांवर दिवाळी आली तरी अनुदान जमा न झाल्याने कामगार संतापले. स्थायी समितीची सभा सुरू असतानाच कामगार सभेत घुसले व घोषणाबाजी करून सभा बंद पाडली. दरम्यान सभापती वाकळे यांनी जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली. मात्र अनुदान दिल्याशिवाय सभा चालू देणार नाही, असा पवित्रा कामगार युनियनने घेतल्याने सभा तहकूब करावी लागली.
निवड समितीने 103 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मंजूर केली. मात्र त्यावर आदेश न निघाल्याने कामगार संतापले. याबाबत सदर प्रकरण जिल्ह्याधिकारी तथा प्रभारी आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असल्याचे मुख्य लेखाधिकारी यांना सांगितले. यावरून कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात यांच्यात बाचाबाची झाली. महापालिकेचेही कामकाज बंद करण्यात आले आहे. दरम्यान दुपारी प्रभारी आयुक्त यांच्या कडे अधिकाऱ्यांची बैठक होत आहे.