महापालिका नगर शहरात उभारणार चार सौरउर्जा प्रकल्प
By अरुण वाघमोडे | Updated: November 6, 2023 17:11 IST2023-11-06T17:10:55+5:302023-11-06T17:11:14+5:30
सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली.

महापालिका नगर शहरात उभारणार चार सौरउर्जा प्रकल्प
अहमदनगर: जिल्हा नियोजन समितीतंर्गत मिळालेल्या निधीतून महापालिका शहरात प्रत्येकी २ मेगावॅट क्षमतेचे चार सौरउर्जा प्रकल्प उभारणार आहे. सावेडी कचरा डेपो, फऱ्याबागजवळील मलनि:सारण प्रकल्प, अमरधाम व बुरुडगाव कचरा डेपो येथे हे प्रकल्प उभारले जाणार असून यासाठी ११ कोटी रुपये खर्च होणार. या प्रकल्पाच्या वाढीव दराच्या निविदांना स्थायी समितीने मंजुरी दिली.
सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली. सभेला नगरसेवक मुद्दसर शेख, प्रदिप परदेशी, राहुल कांबळे, सुनील त्र्यंबके, सुनीता कोतकर, सुवर्णा गेनप्पा, रुपाली वारे, ज्योती गाडे आदी उपस्थित होते. सभेच्या अजेंड्यावर सौरउर्जा प्रकल्प निविदांना मंजुरी यासह २४ विषय होते. सभेने या सर्व विषयांना तत्काळ मंजुरी दिली.
फऱ्याबाग येथील मलनि:सारण पक्रल्पासाठी ९५० किलोवॅट, सावेडी कचरा डेपो येथे ३०० किलोवॅट, बुरुडगाव कचरा डेपो येथे ५०० किलोवॅट तर नालेगावजवळील अमरधाम येथे २५० किलोवॅट असे एकूण चार सौरउर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. या चारही प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही महावितरणला दिली जाणार आहे. या माध्यमातून महापालिकेला या प्रकल्पांसाठी महिनाकाठी येणाऱ्या बिलातून पुरवठा केलेल्या युनिटचे पैसे वजा केले जाणार आहेत. त्यामुळे मनपाचे वर्षाकाठी साधारण दीड कोटी रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.