मनपा इलेक्शन राऊंड : महापौरपदाचा ३०० कोटींचा सौदा
By सुधीर लंके | Published: November 27, 2018 03:42 PM2018-11-27T15:42:29+5:302018-11-27T15:43:25+5:30
‘आमचा महापौर करा, लगेच शहराला तीनशे कोटी रुपये देतो’, असा सरळ सौदाच मांडत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरच्या रणधुमाळीला तोंड फोडले आहे. या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार असे बोलले जाते.
सुधीर लंके
‘आमचा महापौर करा, लगेच शहराला तीनशे कोटी रुपये देतो’, असा सरळ सौदाच मांडत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरच्या रणधुमाळीला तोंड फोडले आहे. या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार असे बोलले जाते. भाजपची सत्ता असल्याने ते खूप पैसे लावणार अशीही चर्चा होती. दानवे यांनी प्रत्यक्षात हा पाऊस पाडायला सुरुवातही केली, असे म्हणता येईल.
अर्थात दानवे यांचे विधान इतके साधे सरळ नाही. ते लबाडाचे आवतन दिसते. ‘सत्ता आली तरच पैसे देऊ,’ असाच त्यांच्या विधानाचा थेट अर्थ निघतो. आम्हाला सत्ता देणार नसाल तर राज्य व केंद्राचा पैसा रोखून या शहराची मुस्कटदाबीही करु शकतो, अशी या विधानाची दुसरी बाजू आहे. म्हणजे सत्ता देणार नसाल, तर तुमचे शहर गेले तेल लावत, असा हा सरळ हिशेब आहे.
राजकारणात मतलबाशिवाय काहीच होत नाही, असे म्हणतात. भाजपही त्याच मार्गाने निघाला आहे. वास्तविकत: गत अडीच वर्षे शहरात सेना-भाजप या मित्रपक्षांचीच सत्ता आहे. उपमहापौरपद भाजपकडे होते. महापालिकेची स्थायी समिती भाजपकडे होती. खासदारकी भाजपकडे आहे. जिल्ह्यात पाच आमदार भाजपचे आहेत. पालकमंत्री भाजपचे आहेत. नगर जिल्ह्याने भाजपला एवढे भरभरुन दिले असताना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरासाठी भाजपने काय दिले? याचा हिशेब दानवे यांनी मांडला असता तर बरे झाले असते.
खासदार दिलीप गांधी यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार भाजप सरकारने या शहराला मूलभूत विकास योजनांसाठी केवळ दहा कोटी रुपये दिले व उड्डाणपुलासाठी मुख्यमंत्र्यांनी पन्नास कोटी देण्याची घोषणा केली आहे. (हा निधी अजून यायचा आहे. साईबाबांच्या शताब्दी उत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी ३२०० कोटी देण्याची घोषणा केल्यानंतर छदामही आलेला नाही हे एक उदाहरण पाठिशी आहे.) त्यामुळे दानवेंचे तीनशे कोटी कधी पोहोचतील, हा पुढचा प्रश्न आहेच. मुद्दा असा आहे, उद्याचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपने आजच्या सत्ताकाळात निधी का दिला नाही? तीनशे कोटी मिळण्यासाठी या शहराने भाजपचाच महापौर होण्याची वाट का पाहत बसावी? महापौर नाही म्हणून सरकार या शहराचे विकासाचे दरवाजे बंद करुन ठेवणार का?
यापूर्वी शहरात असेच घडत आले. शहरात सेना-भाजपची सत्ता असली की राज्यात कॉंग्रेसचे सरकार असायचे. त्यातून निधी अडवला जायचा. आता शहरात व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असतानाही भाजपने निधी दिला नाही. का, तर शतप्रतिशत आम्हालाच सत्ता हवी हा त्यांचाही अट्टाहास.
नगरचा विकास हा राज्यकर्त्यांच्या लहरीवर व मर्जीवर अवलंबून आहे, हे दानवे यांनी सांगूनच टाकले आहे. एकीकडे कॉंग्रेसने निधी दिला नाही, असा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे निधी देण्याबाबत त्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या अटी-शर्तीही टाकल्या. दानवे दिसतात तितके सरळ नाहीत. मराठवाड्यात व जालना जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघात ते ‘दादा’ म्हणून ओळखले जातात. ‘चकवा’ देण्यासाठीही ते खूप प्रसिद्ध आहेत. ते बोलतील तसे करतीलच याचा भरवसा नसतो अशी त्यांची ख्याती आहे. ‘मी बारा भोकाचा सायकलचा पाना आहे. हा पाना कोठेही बसवा. तो फिट बसतो’, अशी उपमा त्यांनीच स्वत:ला दिलेली आहे. मी जेथे नारळ फोडला ती पालिका ताब्यात घेतली, असा दृष्टांतही त्यांनी सांगितला आहे. हा नारळ कोणाला पावणार हे पहायचे.