नगर मनपा निवडणूक २०१८ : पहिल्या दिवशी ३२४ अर्जांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:14 PM2018-11-14T12:14:45+5:302018-11-14T12:14:54+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी ३२४ जणांनी अर्ज विकत घेतले. १७ जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल ...
अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी ३२४ जणांनी अर्ज विकत घेतले. १७ जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. जुन्या शहरातून अर्ज घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज प्रत्यक्षही निवडणूक निर्णय अधिका-यांकडे सादर करावा लागणार आहे. पहिल्या दिवशी एका महिला उमेदवाराने अर्ज दाखल करून श्रीगणेशा केला.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्री आणि अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी पहिला दिवस होता. सकाळपासूनच अर्ज विकत घेण्यासाठी इच्छुकांच्या समर्थकांची गर्दी होती. अर्ज घेणा-यांमध्ये शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक, त्यांचे नातेवाईक आघाडीवर होते. अर्जासह पुस्तिकाही सोबत दिली जात आहे. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळाहून अर्ज डाऊनलोड करून तो आॅनलाईन भरायचा आहे. पहिल्या दिवशी १७ जणांनी आॅनलाईन अर्ज (कंसात प्रभाग क्रमांक) दाखल केले आहेत. शीतल मनोज भूजबळ (१३), मनोहर गजानन जाधव (१), शरद विष्णू शिंदे (१४), अरकान हाफीज जहागीरदार शेख (३), इरफान वाजिद शेख (१०), निहाल अहमद रफीक शेख (१०), अंजली संतोष देवराव (१३) सोहेब जलाल शेख (३), सलमान वाजीद शेख (१), अनिल जॉन भिंगारदिवे (६),भूषणकुमार रामपा मडकरी (१), दीपक नारायण दांगट (९), गोरख प्रल्हाद कंडाळकर (४), प्रमोद अर्जुन लगड ( २) अशी आॅनलाईन अर्ज दाखल केलेल्यांची नावे आहेत.
एकाच्या अर्जावर नावाऐवजी ‘जीजीजी’एवढेच नाव असून तो प्रभाग क्रमांक पंधरासाठी दाखल झाला आहे. विद्यमान महापौर सुरेखा कदम यांच्यासह विद्यमान पदाधिकारी, नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
प्रभाग क्रमांक १३ (क) या सर्वसाधारण महिला या जागेसाठी शीतल मनोज भूजबळ यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्षही अर्ज दाखल केला आहे. बुरुडगाव विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद दाणेज यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भूजबळ यांचा पहिला अर्ज दाखल झाला आहे़
श्रीपाद छिंदमही मैदानात
छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम यानेही निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्याने प्रभाग क्रमांक ९ आणि १३ मधून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज घेतला आहे. छिंदम याला कोणत्याही पक्षाकडून तिकिट मिळण्याची शक्यता नसल्याने तो दोन्ही प्रभागातून अपक्ष निवडणूक लढविणार आहे. एका प्रभागातून तो स्वत: व दुसºया प्रभागातून त्याची पत्नी निवडणूक लढविणार आहे.
अर्ज विक्री संख्या
माळीवाडा विभाग-१५०
सावेडी विभाग-७०
बुरुडगाव विभाग-३२
केडगाव विभाग-७२
एकूण- ३२४