नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:37+5:302021-05-05T04:34:37+5:30
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी कोविड सेंटरमधील कर्तव्य बजावल्यानंतर घरी परतत असताना पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान त्यांची गाडी अडवून या कर्मचाऱ्यांना ...
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी कोविड सेंटरमधील कर्तव्य बजावल्यानंतर घरी परतत असताना पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान त्यांची गाडी अडवून या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर येथे सोमवारी ( दि.३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचा तीव्र निषेध करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी एका दुचाकीवर एकासच प्रवास करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहे, परंतु काही पालिका कर्मचाऱ्यांकडे वाहने नसल्याने त्यांना सहकाऱ्यासोबत एकाच दुचाकीवर जाण्याची वेळ येते. दरम्यान, सोमवारी कोपरगाव शहरातील साई कॉर्नर येथे पालिका व पोलीस पथक संयुक्तरित्या नाकाबंदी करुन कारवाई करत होते. त्याचवेळी एसएसजीएम महाविद्यालयातील कोविड सेंटरमधून पालिका सफाई कर्मचारी देवेंद्र डाके व पंकज गोयर हे कर्तव्य निभावून घरी परतत होते. त्यांच्या अंगावर गणवेश व ओळखपत्र असतानाही पोलिसांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता दुचाकी अडवून चावी काढून घेत मारहाण करून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी कोणताही विचार न करता केलेले कृत्य निषेधार्थ आहे. याबद्दल अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष रणधीर तांबे, शहराध्यक्ष पवन हाडा यांनी दिला आहे. निवेदनाप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, स्वच्छता निरीक्षक सुनील आरण यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.