पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:27 AM2020-12-30T04:27:22+5:302020-12-30T04:27:22+5:30

श्रीरामपुरातील दुकानाचा वाद : मुख्याधिकार्यांनी मागविला खुलासा श्रीरामपूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील बळवंत भुवनसमोरील एका दुकानाच्या मालकीचे हस्तांतरण वसुली ...

Municipal employees warned of disciplinary action | पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

श्रीरामपुरातील दुकानाचा वाद : मुख्याधिकार्यांनी मागविला खुलासा

श्रीरामपूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील बळवंत भुवनसमोरील एका दुकानाच्या मालकीचे हस्तांतरण वसुली विभागातील दोघा कर्मचा-र्यांच्या अंगलट आले आहे. कागदपत्रांची शहानिशा न करताच या कर्मचा-याना वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा ठपका मुख्याधिका-यांनी ठेवला असून शिस्तभंगाच्या कार्यवाहीचा इशारा दिला आहे. तत्कालीन वसुली विभाग प्रमुख दिलीप बाबुराव डेरे व वसुली कर्मचारी गोरक्षनाथ दौंडे यांना मुख्याधिकार्यांनी सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. हे कर्मचारी सन २०१० मध्ये हे काम सांभाळत होते.

बळवंत भुवनसमोरील दुकानासंबंधी अशोक उपाध्ये यांनी राधाकिसन तुकाराम थेटे याचे दुकान खरेदी केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याआधारे पालिकेच्या सभेपुढे कार्यालयीन टिप्पणी सादर करून दुकान हस्तांतरणाचा ठराव करण्यात आला.

वास्तविक राधाकिसन यांचे बंधू जगदीश थेटे यांनी हस्तांतरणाविरूद्ध पालिकेकडे अर्ज दिलेला होता. त्यावर पालिकेच्या वतीने संबंधित दुकानावरील दैनंदिन कर वसुलीचे पाच हजार ४०० रुपये विनाविलंब भरण्याचे आदेश बजावण्यात आले होते. अन्यथा दुकान उचलण्याचा इशारा देण्यात आला. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सन २००७ च्या दप्तरी जगदीश थेटे यांच्या मालकीची नोंद आहे. अशी वस्तुस्थिती असताना कागदपत्रांची शहानिशा न करताच सभेत ठराव पारित करण्यात आला, असे मुख्याधिकार्यांनी कारणे दाखवा नोटीशीत म्हटले आहे.

कर्मचारी गोरक्षनाथ दौंडे यांनी वसुली विभाग प्रमुखांकडे दुकानावर कोणतीही थकबाकी नसल्याचा अहवाल सादर केला. त्यामुळे या बाबी अत्यंत गंभीर असल्याची नोंद मुख्याधिका-र्यांनी केली आहे. सात दिवसांमध्ये लेखी म्हणणे सादर करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कर्मचा-र्यांना देण्यात आला आहे.

Web Title: Municipal employees warned of disciplinary action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.