नगर मनपा निवडणूक २०१८ : महापालिकेच्या मतदार यादीवर ‘हरकतींचा पाऊस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:49 AM2018-10-31T11:49:24+5:302018-10-31T11:49:27+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेने तयार केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची अन्य प्रभागात पळवापळवी झाल्याचे उघड झाले आहे.
अहमदनगर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेने तयार केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची अन्य प्रभागात पळवापळवी झाल्याचे उघड झाले आहे. मतदारांची नावे गायब होणे, मतदारांची नावे अन्य प्रभागात स्थलांतरित होणे अशा तक्रारींचे मोठे प्रमाण आहे. यावर इच्छुकांसह नागरिकांनी आक्षेप घेतले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत तब्बल सातशे हरकती महापालिकेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत, तर इच्छुकही घामाघूम झाले आहेत.
महापालिकेची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांनी त्याचा दोन ते तीन दिवस अभ्यास केला. या यादीवर ३१ आॅक्टोबरपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ६ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे इच्छुकांच्या लक्षात आले. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी सलग दोन-तीन दिवस रात्रं-दिवस यादीचा अभ्यास केला. त्यामध्ये प्रभागात वास्तव्य असलेली नावेच गायब असल्याचे दिसले. अनेकांची नावे विधानसभा मतदार यादीत आहेत, मात्र कोणत्याही प्रभागांच्या यादीत नाहीत. एक ते दोन हजार मतदारांचे वास्तव्य एका प्रभागात आणि नावे मात्र दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या चारही झोन कार्यालयांमध्ये तक्रारी, आक्षेप मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत तब्बल सातशे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
सोमवारी २१४ हरकती आल्या होत्या. मंगळवारी तब्बल पाचशेच्या वर हरकती स्वीकारण्यासाठी महापालिकेच्या अधिकाºयांची एकच धावपळ उडाली. दरम्यान केंद्रस्तरीय मतदार अधिकाºयांमुळे मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ झाल्याची तक्रार सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे केली.
चुकीच्या पद्धतीने मतदार यादी तयार झाल्याचा आक्षेप शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनीही घेतला आहे.
महापौर सुरेखा कदम यांनीही त्यांच्या प्रभागातील नावे अन्य प्रभागात समाविष्ट झाल्याची हरकत घेतली आहे. त्यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक, इच्छुकांनी मंगळवारी हरकती दाखल करण्यासाठी महापालिका, झोन कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली होती.