नगर मनपा निवडणूक : जवाब दो ! शाळा चांगली; पालिकेने वेशीला टांगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 03:52 PM2018-11-27T15:52:16+5:302018-11-27T15:52:19+5:30
महानगरपालिकेच्या शहरातील ज्या काही उत्कृष्ट शाळा आहेत,
सोनल कोथिंबिरे / रोहिणी मेहेरे
महानगरपालिकेच्या शहरातील ज्या काही उत्कृष्ट शाळा आहेत, त्यामध्ये केडगाव येथील ओंकारनगरची प्राथमिक शाळा, लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय (रिमांड होम), रेल्वे स्टेशनजवळील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा यांचा समावेश होतो़ यातील ओंकारनगरच्या शाळेला आयएसओ मानांकन देऊन गौरविण्यात आले आहे़ या शाळांच्या समस्या मोठ्या नाहीत़ पण किरकोळ समस्यांकडेही पालिका लक्ष देत नाही़ रेल्वेस्टेशनच्या समोरच असलेल्या महापालिकेच्या शाळेला विद्युत पुरवठा व्हावा, तेथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, ई-लर्निंगसाठी संगणक उपलब्ध व्हावेत, या शाळेच्या मागण्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहेत़ महापालिकेच्या शिक्षण विभागाचे नाक समजल्या जाणाऱ्या शाळेकडेच होणारे दुर्लक्ष शिक्षकांसह नागरिकांनाही सहन होत नाही़ महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी या शाळेच्या मागण्यांबाबत कधी जागे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
महापालिकेची ओंकारनगर येथील शाळा आदर्श समजली जाते़ या शाळेला १३ सप्टेंबर २०१८ रोजी आयएसओ मानांकन मिळाले आहे़ या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत़ त्यात एकूण ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ शाळेतील मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, शिक्षक शिवराज वाघमारे, शिक्षिका वृषाली गावडे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेत आहेत़ शाळेत ई-लर्निंगपासून वेगवेगळे प्रयोग राबवित आहेत़ परिसरातील नागरिकही विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्य पुरवून शाळेच्या विकासाला हातभार लावीत आहेत़
रेल्वे स्टेशनच्या समोरच डॉ़ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा आहे़ येथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून, येथे २१३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ मुख्याध्यापक विजय घिगे, शिक्षक विठ्ठल आठरे, अनिल बडे, शिक्षिका मनिषा शिंदे, सुशीला घोलप, वर्षा लोंढे, भारती कवडे, अंजली साळुंके हे स्वखर्चातून शाळेसाठी शालेय साहित्य देतात़ शाळेची रंगरंगोटी करतात़ पण या शाळेतील विद्यार्थ्यांना मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास होतो़ शाळेच्या मैदानात पावसाळ्यात पाणी साचते़ हे पाणी गटारमध्ये काढून देण्याची मागणी आहे़ या शाळेतील तीन वर्गांमध्ये विद्युत पुरवठा होत नाही़ तसेच विद्यार्थ्यांना ई-लर्निंगसाठी संगणक मिळावेत, अशी या शाळेतील शिक्षकांची मागणी आहे़ १४ आॅगस्ट २०१८ रोजी महापालिकेला या शाळेने प्रस्ताव दिला आहे़ पण त्याबाबत अद्याप काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही़ त्यामुळे शिक्षकांनाही शिकविण्यात अडचणी येत आहेत़ रिमांडहोम येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत़ या वर्गांमध्ये ९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ हे सर्व विद्यार्थी अनाथ असून, त्यांना पाच शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत़ मुख्याध्यापक शशिकांत वाघुलकर, शिक्षक अमोल बोठे, शिक्षिका ज्योती गहिले, मनिषा बारगळ, दीपाली शेवाळे हे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत़ येथील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत़
‘लोकमत’चे आवाहन
‘लोकमत’ने वेळोवेळी शहरातील समस्यांना वाचा फोडली. नागरिकांनीही महापालिकेकडे अनेक प्रश्न मांडले. सदर प्रश्नांच्या सोडवणुकीचे आश्वासन त्या-त्या वेळी महापालिकेचे पदाधिकारी आणि संबंधित नगरसेवकांनी दिले. या प्रश्नांचे खरोखरच काय झाले? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘जवाब दो’ या मोहिमेद्वारे ‘लोकमत’ या निवडणुकीत करत आहे. महापालिका शाळांच्या दुरावस्थेपासून त्यास सुरवात केली आहे. याबाबत सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी काही मत नोंदवू इच्छित असतील, तर त्यांच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
- संपादक