नगर मनपा निवडणूक : पैसे घेणा-या मतदारांवरही फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:45 AM2018-12-06T11:45:16+5:302018-12-06T11:45:19+5:30
उमेदवारांची पात्रता न बघता अनेक मतदारही दारु, पैसा व भेटवस्तूंच्या आमिषाला बळी पडून मतदान करतात. अशा मतदारांचाही आता जिल्हा प्रशासनाने शोध सुरु केला आहे.
अहमदनगर : उमेदवारांची पात्रता न बघता अनेक मतदारही दारु, पैसा व भेटवस्तूंच्या आमिषाला बळी पडून मतदान करतात. अशा मतदारांचाही आता जिल्हा प्रशासनाने शोध सुरु केला आहे. मतदार पैसे घेताना आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे निवडणूक शाखेने सांगितले.
नगरच्या निवडणुकीत पैसा, दारु या बाबींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. काही उमेदवारांनी एक कोटी रुपयांपर्यंत निवडणुकीचे बजेट ठेवले आहे. मताला पैसे ठरवून घरनिहाय पैसे देण्याचा उद्योग काही उमेदवारांनी सुरु केला आहे. मतदारांना पैसे वाटायचे व नंतर विकास कामे न करता टक्केवारी काढायची असा गोरखधंदाच सुरु आहे. नगरचा विकास रेंगाळण्यास नगरच्या मतदारांची ही मानसिकताही कारणीभूत ठरली आहे.
अपार्टमेंटमध्ये राहणारे काही उच्चभ्रू मतदार देखील भेटवस्तू व पैशांची अपेक्षा बाळगून आहेत. त्यामुळेच मतदारांवरही करडी नजर ठेवण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. शहरात अनेक प्रभागात सीसीटीव्ही आहेत. अपार्टमेंटमध्येही सीसीटीव्ही आहेत.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात कोण कोण आले? त्यांचा उद्देश काय होता? हे तपासले जाणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी बँकांमधील व्यवहार तपासण्याचाही निर्णय घेतला आहे.
उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’ दाबा : ग्राहक संघ
नगरच्या मतदारांनी दारु, पैसा याच्या मोहाला बळी पडून मतदान करु नये. नागरिकांच्या या वृत्तीनेही शहराचे नुकसान केले आहे. आपणाला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर मतदानालाच जायचे नाही हाही पर्याय योग्य नाही. उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’चे बटन दाबण्याचा पर्याय मतदारांकडे आहे, असे आवाहन ग्राहक संघाचे शिरीष बापट यांनी केले आहे.
हॉटेलांचीही होणार तपासणी
शहरात अनेक हॉटेलांमध्ये मोफत जेवणावळी सुरु आहेत. मतदारांना पार्टी द्यायची व त्याची बिले घ्यायची नाहीत, असे आमिष दाखवले जात आहे. हॉटेलमध्ये किती लोक जेवणासाठी आले व तेवढी बिले संगणकावर आहेत का? अशी शहानिशा करण्याचेही प्रशासनाच्या विचाराधीन आहे. यासाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रशासनाला गोपनीय माहिती कळवा
अनेक प्रभागात दारु, पैशांचे वाटप सुरु झाले आहे. मात्र, प्रभागातील सुजाण नागरिक याबाबत मौन बाळगून असतात. नागरिकांनी याबाबत माहिती दिल्यास ती गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने कळविले आहे. नागरिकांना पैसे, दारु वाटपाबाबत काही माहिती समजल्यास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (८१४९५३२५७७), आचारसंहिता कक्ष प्रमुख संदीप निचीत (९६६५६६९७७७), उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ (९४२३४६८१११) यांच्याकडे माहिती कळवू शकतात. तक्रार करणाºयांची नावे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले.
उमेदवारांनी केले मतदारांचे आधार कार्ड जमा
अनेक प्रभागात उमेदवारांनी बेकायदेशीरपणे मतदारांचे आधार कार्ड जमा केले आहे. पैसे देऊन मतदारांचे आधारकार्ड ताब्यात घ्यायचे व मतदानाला जाताना हे आधार कार्ड ताब्यात द्यायचे. जेणेकरुन हा मतदार इतर कुणाला मतदान करणार नाही, अशी ही शक्कल आहे. अनेक प्रभागांत पैशांचे वाटप सुरु झाली असल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकृतपणे कुणीही याबाबत बोलत नाही.