नगरचे वस्तू संग्रहालय आता डिजिटल रूपात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 03:01 PM2019-05-18T15:01:21+5:302019-05-18T15:01:51+5:30
शेकडो वर्षांची वीस हजारांहून अधिक पुस्तके व लाखों दुर्मिळ दस्ताऐवजांचे स्कॅनिंग, विविध घराण्यांच्या ऐतिहासिक दप्तरांचे जतन, दुर्मिळ वस्तूंचा टचस्क्रिनद्वारे होणारा उलगडा, गाईडविना हेडफोनद्वारे मिळणारी वस्तूंची माहिती, संग्रहालयाबद्दल
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : शेकडो वर्षांची वीस हजारांहून अधिक पुस्तके व लाखों दुर्मिळ दस्ताऐवजांचे स्कॅनिंग, विविध घराण्यांच्या ऐतिहासिक दप्तरांचे जतन, दुर्मिळ वस्तूंचा टचस्क्रिनद्वारे होणारा उलगडा, गाईडविना हेडफोनद्वारे मिळणारी वस्तूंची माहिती, संग्रहालयाबद्दल खडान्खडा माहिती दर्शवणारे अॅप, मोडी लिपीचे देवनागरीत रूपांतर करणारे सॉफ्टवेअर, नूतनीकरण झालेली चकाचक इमारत, संपूर्ण संग्रहालय सीसीटीव्ही कॅमेराबद्ध... अशा अनेक तºहेने ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील ठेव्याला चकाकी मिळाली असून संग्रहालयाने डिजिटल रूपात प्रवेश केला आहे.
अहमदनगर शहराचे भूषण असलेले ऐतिहासिक वस्तू संग्रहालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस प्रशस्त जागेत उभे आहे. इतिहासाच्या नोंदी पुढच्या पिढीला समजाव्यात म्हणून सरदार बाबासाहेब मिरीकर यांनी १९२५-३०ला वाड्मय इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. पुढे १ मे १९६० रोजी त्याचे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय झाले. संग्रहालयात सध्या मोडी, फार्सी, अरेबिक व संस्कृत अशा विविध भाषांमधील तब्बल दहा हजारांपेक्षाही अधिक कागदपत्रे, दस्ताऐवज आहेत. इतिहासविषयक जुन्या व दुर्मिळ पुस्तकांचा मोठा संग्रह, अतिशय जुन्या पोथ्या संस्थेत आहे. सन १७५० मध्ये सूर्यभट्ट यांनी लिहिलेली पोथी येथे असून याचे वैशिष्ट्य म्हणजे ही पोथी डावीकडून वाचली तर कृष्णकथा आणि उजवीकडून वाचली की रामकथा होते. रघुनाथ निळकंठ यांची सन १७७५ मध्ये तयार करण्यात आलेली तब्बल २०० फूट लांबीची जन्मपत्रिका येथे आहे. सन १८१६ मध्ये ब्रिटिशांनी तेव्हाच्या अखंड हिंदुस्थानचा नकाशा लंडनमध्ये छापला, त्याची प्रत या संग्रहालयात पाहायला मिळते.
१९७५पासून कै. सुरेश जोशी यांनी संग्रहालयाची धुरा सांभाळून हे संग्रहालय खऱ्या अर्थाने फुलवले. त्यांच्याच काळात अनेक दुर्मिळ खजिन्याचा ओघ येथे झाला. २०१२ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर इतिहासप्रेमी डॉ. रवींद्र साताळकर यांनी कार्यकारी विश्वस्त म्हणून सूत्रे स्वीकारली. दरम्यान, संग्रहालय वस्तूंनी श्रीमंत असले तरी कोणतीही आर्थिक मदत नसल्याने वस्तू जतन करणे जिकिरीचे होऊ लागले. परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी वस्तू संग्रहालयासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून तब्बल तीन कोटी रूपयांची तरतूद केली आणि तेव्हापासून संग्रहालयाचे रूपडेच पालटले.
इमारतीची डागडुजी, रंगकाम, इंटेरिअर, बगिचा विकास अशा तीन प्रकारांत हे काम सुरू झाले. संग्रहालयात शेकडो वर्षांपूर्वीची पुस्तके स्कॅन करून त्याच्या पीडीएफ फाईल केल्या जात आहेत. त्यामुळे ही पुस्तके इंटरनेटवर केव्हाही उपलब्ध असतील. याशिवाय संग्रहालयात असणारा शस्त्रास्त्रे विभाग, सैनिकांचा पोशाख, पगड्या भिंतीवर सजवण्यात आल्या आहेत. तसेच पोथी लघूचित्र, नाणीसंग्रह, नकाशे व जुने दस्तऐवज काचेच्या शोकेशमध्ये संवर्धित केल्या आहेत.
पेशवेकालीन शस्त्रात्रे, तसेच इतर माहितीसाठी येथे टचस्क्रिनची सोय करण्यात येणार आहे. ज्या वस्तूबद्दल माहिती हवी असेल, तेथील स्क्रिनला स्पर्श करताच सर्व माहिती डिस्प्लेवर दिसेल. येथील अनेक वस्तंूचे संदर्भ देण्यासाठी गाईडची गरज असते, परंतु पूर्णवेळ गाईड ठेवणे शक्य नसल्याने त्या वस्तूंची आॅडिओ स्वरूपात माहिती रेकॉर्ड करून ती कधीली हेडफोनद्वारे ऐकली जाऊ शकते. असे हेडफोन काही दिवसांतच या विभागात सज्ज होणार आहेत.
नूतनीकरण पूर्ण
संग्रहालयातील संपूर्ण वस्तूंची माहिती, त्यांचे छायाचित्र अशी इत्यंभूत माहिती आॅनलाईन मिळण्यासाठी संस्थेचे अॅप व संकेतस्थळही लवकरच विकसित होणार आहे. संग्रहालयाचे अभिरक्षक प्रा. संतोष यादव यांच्या प्रयत्नातून संस्थेने अलीकडेच मोडी टू देवनागरी आणि देवनागरी टू मोडी रूपांतराचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. संस्थेत सर्व विभागांत सीसीटीव्ही यंत्रणा बसवली असून, इमारतीची रंगरंगोटी, फर्निचर व आकर्षक इंटेरिअरचे काम पूर्ण झाले आहे. परिसरात प्रशस्त पार्किंग, पेव्हिंग ब्लॉक, कंपाऊंडचे काम पूर्ण झाले असून, बगिचाचे काम प्रगतीपथावर आहे. संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर व अभिरक्षक प्रा. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रहालय कार्यरत आहे.