पालिका हद्दीत अतिक्रमण करणारा पालिका लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:53 PM2018-12-07T15:53:23+5:302018-12-07T15:53:37+5:30
शहरातील शेवगाव रोडवरील अर्जुनबाबा मंदिरालगत असलेल्या शासकीय जागेवर पालिकेच्याच कर्मचा-याने अतिक्रमण करून अतिक्रमण काढायला गेलेल्या
पाथर्डी : शहरातील शेवगाव रोडवरील अर्जुनबाबा मंदिरालगत असलेल्या शासकीय जागेवर पालिकेच्याच कर्मचा-याने अतिक्रमण करून अतिक्रमण काढायला गेलेल्या अतिक्रमण विरोधी विरोधी पथकाला धमकावून सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणीपालिका लिपिक शौकत इब्राइम सय्यद यास मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी निलंबित केले आहे.
शहरातील शेवगाव रोड लगत जुन्या साकेगाव रस्त्याची जागा खुली असून त्याबाबत न्यायालयात वाद प्रलंबित आहे. याच बाबीचा गैरफायदा घेत नगर पालिका कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेले शौकत इब्राइम सय्यद यांनी अर्जुनबाबा मंदिरा लगतच्या सुमारे दोन गुंठे खुल्या जागेवर पालिकेच्या परवानगी नसताना पत्र्याचे शेड उभारले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी सय्यद यांच्या बेकायदा बांधकामा बाबत पालिकेच्या अतिक्रमण विभागाला तक्रारी केल्या होत्या. त्याच अनुषंगाने ६ डिसेंबर रोजी अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख सोमनाथ गर्जे तसेच अभियंता संजय गिरमे, कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद, बांधकाम विभाग प्रमुख किशोर पारखे, पाणीपुरवठा अभियंता कुणाल पाटील, अशोक डोमकावळे, अंबादास साठे, कुरेश पठाण, शिवाजी पवार असे कर्मचारी अतिक्रमन काढण्यासाठी जागेवर गेले असता शौकत सय्यद यांनी पथकातील अतिक्रमण हटवण्यास विरोध करत जागा माज्या पत्नीच्या नावे असून अतिक्रमण काढल्यास तुमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात पत्नीला फिर्याद दाखल करायला लावीन अशा धमक्या देत अतिक्रमण हटवण्यास विरोध केला. याबाबत अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सोमनाथ गर्जे व इतर कर्मचा?्याचे लेखी म्हणणे व सविस्तर अहवाल मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना सादर केला असता पालिका लिपिक शौकत इब्राइम सय्यद यास महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८१ व महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील तरतुदी नुसार ७ डिसेंबरच्या मध्यांनानंतर पुढील आदेशा पर्यंत निलंबित करण्यात आले आहे.