भाजीपाला विकणाऱ्या आईवर पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:34+5:302021-05-05T04:34:34+5:30

कर्मचारी असलेल्या मुलाने केली कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क पाथर्डी (जि. अहमदनगर) : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने लागू केलेले नियम ...

Municipality on the mother who sells vegetables | भाजीपाला विकणाऱ्या आईवर पालिका

भाजीपाला विकणाऱ्या आईवर पालिका

कर्मचारी असलेल्या मुलाने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

पाथर्डी (जि. अहमदनगर) : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने लागू केलेले नियम पायदळी तुडवून अनेकजण आपली दुकाने चालू ठेवीत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. या कारवाईतही कर्मचाऱ्यांकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप दुकानदार करीत आहेत. मात्र, पाथर्डी शहरात एका पालिका कर्मचाऱ्याने थेट आपल्या आईवरच कारवाई करीत कर्तव्याला प्राधान्य दिले अन् आरोप करणाऱ्यांची बोलतीच बंद केली. भावनेपेक्षा व नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजणाऱ्या या कर्मचाऱ्याचे नाव आहे रशिद शेख आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन गर्दी नियंत्रण, नियमांची अंमलबजावणी व जनजागृती मोहिमेमध्ये व्यस्त आहे.

रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्यासाठी सध्या मनाई आहे. मात्र, रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या आईचा सर्व भाजीपाला शेख यांनी उचलून घंटागाडीत टाकून कारवाई केली. भावनेपेक्षा व नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजणाऱ्या शेख यांचे शहरातून कौतुक होत असून तहसीलदार, मुख्याधिकारी यांनीही शेख यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले आहे.

पालिका कर्मचाऱ्यांची टीम सकाळी सात ते अकरा या वेळेत फिरून नियम मोडणारे विक्रेते, व्यापारी, फेरीवाले आदींविरुद्ध कारवाई करते.

बाजार तळावर दररोजचा भाजी बाजार भरतो. येथे रस्त्याच्या कडेला बेगम शफिक शेख ही ज्येष्ठ महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. शहरात सर्वत्र ठिकठिकाणी दररोज भाजी विक्रेते बसतात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पालिका कर्मचाऱ्यांचे पथक बाजार तळात आले असता नियम मोडून दुकानदारी करणाऱ्यांचे शटर फटाफट बंद झाले. भाजी विक्रेत्या महिलांनीही विक्री थांबवली. घरोघर फिरून भाजी विकायला परवानगी असून एका जागी बसायला नाही असे सांगत पालिका कर्मचारी रशीद शेख यांनी प्रथम आई बेगम शेख यांच्यावर कारवाई केली. त्यांचे भाज्या भरलेले सर्व घमेले उचलून घंटागाडी टाकले. मुलाची कारवाई पाहून भाजीविक्रेती आई निमूटपणे बाजूला जाऊन मुलाचे कर्तव्य कौतुकाने बघत होती. ही कारवाई पाहून इतरांनी तत्काळ सर्व व्यवहार बंद केले. या कारवाईची माहिती काही वेळातच शहरभर पसरली. तहसीलदार श्याम वाडकर, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनीही शेख यांच्या कर्तव्यभावनेचे कौतुक करत सर्व कर्मचाऱ्यांनी नेटाने काम करून शहर लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

.........

शहरात कारवाईसाठी फिरताना शटर उघडून गुपचूप व्यवसाय करणारे व्यापारी आमच्यावरच आरोप करतात. टीका करतात. काम करताना आपण कोणाचाही दबाव मानत नाही. मी माझे काम प्रामाणिकपणे करीत आहे. माझ्या आईने कायदा मोडला तरी कर्तव्य म्हणून मी कारवाई केली आहे. घरी गेल्यावर पुत्र या नात्याने तिची समजूत काढेन, पण नियम तर सर्वांसाठी सारखेच आहेत. सर्वांनी नियमांचे पालन करावे व कोरोनाविरोधातील लढ्यात प्रशासनाला साथ द्यावी.

-रशिद शेख, सफाई कर्मचारी, पाथर्डी नगरपालिका.

Web Title: Municipality on the mother who sells vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.