नगरपालिकेने प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:52+5:302021-05-10T04:19:52+5:30
याप्रश्नी तातडीने कार्यवाही न केल्यास नगरपालिकेत घेराओ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी अनिल पवार ...
याप्रश्नी तातडीने कार्यवाही न केल्यास नगरपालिकेत घेराओ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी अनिल पवार तसेच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहराची लोकसंख्या लक्षात घेता एक लसीकरण केंद्र पुरेसे नाही. या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असून, अनेकांना लसीविना परतावे लागत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही खूप त्रास होत आहे. शहराचा विस्तार लक्षात घेता प्रभागनिहाय लसीकरण केंद्र कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
या दृष्टीने नगरपालिकेने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने नगरपालिकेत घेराओ आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, लोकसेवा विकास आघाडीचे रोहन डावखर, अमित कोलते, संकेत संचेती, संदीप डावखर, वैभव सुरडकर, मनोज दिवे, सचिन पाळंदे आदींच्या सह्या आहेत.