लोणी मावळा खून प्रकरणातील आरोपींना मृत्युदंड द्या; उज्ज्वल निकम यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 06:00 PM2017-11-07T18:00:34+5:302017-11-07T18:04:46+5:30
लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खूनखटल्यात सोमवारी जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाला. मंगळवारी आरोपी व सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला. या खटल्याचा १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निकाल देण्यात येणार असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी सांगितले.
अहमदनगर : लोणी मावळा (ता. पारनेर) येथे तिघा आरोपींनी कट रचून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केला़ त्यानंतर तिचा अतिशयनिर्घृणपणे खून केला़ अशा पद्धतीने अत्याचार आणि खून अपवादात्मक घटना आहे. सरकारी पक्षाने समोर आणलेले साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोपींना मृत्युदंड हीच शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केली.
लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खूनखटल्यात सोमवारी जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाला. मंगळवारी आरोपी व सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला. या खटल्याचा १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निकाल देण्यात येणार असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी सांगितले.
न्यायालयाने मंगळवारी आरोपींना समोर बोलावून शिक्षेबाबत त्यांचे म्हणणे विचारले़ सरकारी पक्षातर्फे अॅड. निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. निकम म्हणाले, लोणी मावळा येथे २२ आॅगस्ट २०१४ रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खुनाची घटना घडली. या घटनेच्या आधी मात्र आरोपी क्रमांक एक संतोष लोणकर याने सदर मुलीची छेड काढून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २२ आॅगस्टला संतोष लोणकरसह मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे यांनी तिचा पाठलाग केला. मुलीस पकडून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला. त्यानंतर तिच्या नाका-तोंडात चिखल घातला़ संतोष लोणकर याने मुलीच्या डोक्यावर स्कू्रड्रायव्हरने वार केले. मंगेश लोणकर याने तिच्या डोक्यात दगड घातला, तर दत्तात्रय शिंदे याने मुलीचे पाय पकडून ठेवले होते. तसेच मुलीच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर सर्वत्र चिखल टाकला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या सर्व अंगावर जखमा आढळून आल्या होत्या. आरोपींनी अतिशय विकृत पद्धतीने हे कृत्य केले. या घटनेतील सर्व आरोपी हे समजदार आहेत़ केलेल्या कृत्याचे परिणाम त्यांना माहीत होते. तरीही त्यांनी हे कृत्य केले. या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला होता. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अॅड़ निकम यांनी केली. खटल्याचा मंगळवारीच निकाल लागेल या अपेक्षेने न्यायालयात पीडित मुलीचे आई-वडील, इतर नातेवाईक व मैत्रिणी व ग्रामस्थ उपस्थित होते. आरोपींचे नातेवाईकही न्यायालयात उपस्थित होते.
माझी नार्को करा
न्यायालयाने आरोपींना शिक्षेबाबत म्हणणे मांडण्याची संधी दिली, तेव्हा आरोपी क्रमांक दोन मंगेश लोणकर याने मी निर्दोष आहे. माझी नार्को चाचणी करा, अशी मागणी केली. तसेच आरोपी संतोष लोणकर म्हणाला, मला तीन मुली आहेत. याचा विचार व्हावा. आरोपी दत्तात्रय शिंदे म्हणाला, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. घटनेआधी मी आठ दिवस लोणी मावळा येथे कामासाठी आलो होता.
आरोपी पक्षाकडून युक्तिवाद
आरोपीच्या वतीने अॅड. अनिल अरोटे व परिमल फळे यांनी युक्तिवाद केला. आरोपी हे सराईत गुन्हेगार नाहीत. तसेच त्यांच्या पाठीमागे कुटुंब आहे. याचा विचार करून त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद करण्यात आला. यावेळी अॅड. निकम यांनी आक्षेप घेत आरोपींचा इतिहास गुन्हेगारीचा नसला, तरी ते पुन्हा गुन्हा करणार नाहीत, हे कशावरून. तसेच दुर्जनांना सज्जन करण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तर ते कधीच सज्जन होत नाहीत, असा युक्तिवाद केला.
सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचा संदर्भ
अॅड. निकम यांनी शिक्षेवर युक्तिवाद करताना सर्वोच्च न्यायालयातील बच्चनसिंग विरोधात पंजाब सरकार यासह तीन खटल्यांचा संदर्भ देत आरोपींना फाशीची शिक्षाच योग्य असल्याचे नमूद केले.