जामखेडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून - पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 03:45 PM2018-05-03T15:45:24+5:302018-05-03T15:45:57+5:30

जामखेड येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड व एक अल्पवयीन अशा दोघांना ताब्यात घेतले. दीड वर्षांपासूनच्या पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

The murder of NCP workers in Jamkhed was preceded by - Superintendent of Police Ransom Kumar Sharma | जामखेडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून - पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा

जामखेडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून - पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा

ठळक मुद्देमुख्य आरोपी गोविंद गायकवाडसह दोघे जेरबंद

अहमदनगर : जामखेड येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड व एक अल्पवयीन अशा दोघांना ताब्यात घेतले. दीड वर्षांपासूनच्या पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जामखेड येथे दि. २८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जामखेडचा माजी सरपंच कैलास माने याच्यासह प्रकाश माने, दत्ता गायकवाड, सचिन गोरख जाधव, बापू रामचंद्र काळे अशा पाचजणांना अटक केली असून, हत्याकांडातील मुख्य आरोपी गोविंद गायकवाड (वय २२, रा. तेलंगसी, ता. जामखेड, हल्ली शिवशंकर तालीम, जामखेड) फरार होता. स्थानिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, तसेच जामखेड पोलीस अशी पोलिसांची विविध पथके आरोपींच्या तपासासाठी फिरत होती. अखेर बुधवारी (दि. २ मे) मध्यरात्री पथकाने गायकवाड व आणखी एक अल्पवयीन आरोपी या दोघांना मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे ) येथून ताब्यात घेतले. तिसरा आरोपी विजय आसाराम सावंत (रा. वाकी, ता. जामखेड) फरार आहे. या तिघांनीच गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस चौकशीत बरिच माहिती या आरोपींकडून मिळाली आहे.

बाचाबाची ते हत्याकांड
गोविंद गायकवाड व राळेभात बंधू यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून वितुष्ट होते. डिसेंबर २०१६मध्ये राळेभात कुटुंबियांच्या परिचयातील एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावरून जात असताना गोविंद गायकवाडकडून त्या वृद्धाच्या अंगावर रस्त्यावरील पाणी उडाले. त्यामुळे वृद्धाने याचा जाब गोविंदला विचारला. त्याचा राग आल्याने गोविंदने त्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. याबाबत संबंधित वृद्धाने योगेश राळेभात व राकेश राळेभात यांना माहिती दिली. त्यानंतर राळेभात बंधूंनी गोविंदला गाठून मारहाण केली. तेथूनच या वादाला सुरूवात झाली. पुढे हा वाद विकोपाला गेला, परंतु काही लोकांनी मध्यस्थी केल्याने तात्पुरते भांडण मिटले. त्यामुळे पोलीस ठाण्यात फिर्याद आलीच नाही. त्यानंतर या दोन गटांत कायमच खुन्नस राहिली. रस्त्याने येता-जाता रागाने पाहणे, शेरेबाजी करणे असे प्रकार सुरूच होते. राळेभात गटाचे हे वर्चस्व सहन न झाल्याने गोविंद गायकवाडने राळेभात बंधूंचा काटा काढण्याचा निश्चय केला. योगेश व राकेश एकाच वेळी एकांतात कुठे भेटतील, अशा संधीच्या शोधात तो गेल्या अडिच महिन्यांपासून होता. हत्येच्या घटनेपूर्वीही त्याने एक-दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो यशस्वी ठरला नाही. अखेर गोविंदने दि. २८ रोजी सायंकाळी योगेश व राकेश यांना एकांतात गाठलेच. गोविंदने योगेशवर, तर दुसऱ्या अल्पवयीन साथीदाराने राकेशवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यात तिसरा आरोपी विजय सावंत याचाही सहभाग होता. परंतु तो अद्याप फरार आहे, अशी कबुली खुद्द गोविंद व त्याच्या साथीदाराने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मध्यप्रदेशातून आणले पिस्तूल
राळेभात गटासोबत रोजच होणाºया कटकटीला गोविंद वैतागला होता. एक काय तो निकाल लावण्याचा चंग त्याने बांधला. त्यातूनच हत्येचा प्लॅन पुढे आला. योगेश व राकेश यांना मारण्यासाठी गोविंदने दोन पिस्तुल व काही काडतुसे मध्यप्रदेशला जाऊन आणली. पोलिसांनी आता ती जप्त केल्याचे समजते.

Web Title: The murder of NCP workers in Jamkhed was preceded by - Superintendent of Police Ransom Kumar Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.