अंबालिकाजवळ झालेल्या खुनाची चौकशी व्हावी; वंचित बहुजन आघाडीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:32 PM2020-11-21T13:32:37+5:302020-11-21T13:33:48+5:30
कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाला कारखान्याच्याच कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर चोरीच्या संशयातून मारहाण केली व त्याचा खून केला. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करावा; अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे व मयताच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाला कारखान्याच्याच कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर चोरीच्या संशयातून मारहाण केली व त्याचा खून केला. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करावा; अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे व मयताच्या कुटुंबीयांनी दिला आहे. शुक्रवारी (दि. २०) बारसे व मयताच्या कुटुंबीयांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्याजवळ कोपर्डी येथील मयत समाधान रमेश शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल आहे. परंतु वैद्यकीय अहवालानुसार मयताच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे आरोपींवर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून या गुन्ह्याची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी मयताचे भाऊ बाळू रमेश शिंदे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिंदे कुटुंबास न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बारसे यांनी दिला आहे. मयत समाधान रमेश शिंदे याच्यावर ट्रॅक्टर चोरीचा संशय घेऊन त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे समाधान शिंदे याचा मृत्यू झाला. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात ११ नोव्हेंबरला गुन्हा दाखल आहे. पण यात खुनाचे कलम नाही. हे कलम समाविष्ट करून सर्व आरोपीं ना अटक करण्यात यावी, न्याय न मिळाल्यास शिंदे कुटुंब दि. २२ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. |