पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; कोळगाव शिवारातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:09 PM2020-01-05T18:09:20+5:302020-01-05T18:10:48+5:30
पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील मोहरवाडी येथे शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
विसापूर : पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील मोहरवाडी येथे शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. हस्तीमल चाप्या भोसले (वय ७०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत हस्तीमल काळे याचा मुलगा किशोर हस्तीमल काळे याने सात जणांविरुध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आलुशा रमेश काळे, रमेश मोतीलाल काळे, गिल्या रमेश काळे, कलंकाबाई रमेश काळे, सतेश नाकवाशा काळे, छत्तीशा नाकवाशा काळे, खुल्या पंडित्या काळे या सात जणांवर खुनाचा आरोप करण्यात आला आहे. सात-आठ महिन्यांपूर्वी हस्तीमल काळे याने एका चोरीच्या आरोपात वरीलपैकी काही आरोपींना पकडून देण्यास पोलिसांना मदत केली होती, असा आरोपींना संशय होता. त्या संशयावरून आरोपींनी हस्तीमल काळे यास एकट्याला गाठून ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाल्याने अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, बेलवंडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी फरार आरोपींचा शोध घेत आहेत.