शेतीच्या वादातून एकाचा खून; तीन जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:06 PM2020-05-11T12:06:07+5:302020-05-11T12:06:30+5:30
संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कु-हाड घालून एकाचा भरदिवसा खून करण्यात आला. सतीष छबू यादव (वय ३६) असे खुनात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कु-हाड घालून एकाचा भरदिवसा खून करण्यात आला. सतीष छबू यादव (वय ३६) असे खुनात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (दि.१०) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील सतीष यादव यास दुपारच्या वेळी घरातून बोलावून घेत शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आली. डोक्यात कुºहाड घातल्याने यादव हे जबर जखमी झाले. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच यादव यांचा मृत्यू झाला होता. घटनेतील माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकासह कौठेकमळेश्वर येथे धाव घेतली. हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण औटी, विष्णू आहेर, राजू खेडकर, अण्णासाहेब दातीर, बाबा खेडकर, यमना जाधव, ओंकार शेंगाळ, लुमा भांगरे यांच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला.
याप्रकरणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या रिपोर्टनुसार लोणी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. खून प्रकरणी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.